आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच मुंबईत कोरोना बळींवर अंत्यसंस्कार, मुंबई महानगरपालिकेची ग्वाही
दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत या कोरोनाबाधितांचे मृतदेह मोठ्या प्रमाणावर आणले जातात. तसे असले तरी तिथं केंद्र सरकार आणि राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं आयसीएमआरने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करताच अंत्यसंस्कार केले जातात असा मुख्य आरोप या याचिकेत करण्यात आला होता.
मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कमध्ये कोरोनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आयसीएमआरने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पूर्ण पालन करूनच कोरोना बाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत, अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयात पालिका प्रशासनानं सादर केली. याची दखल घेत हायकोर्टानं यासंदर्भातील याचिका शुक्रवारी निकाली काढली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांची तसेच कोरोना बळींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत या कोरोनाबाधितांचे मृतदेह मोठ्या प्रमाणावर आणले जातात. तसे असले तरी तिथं केंद्र सरकार आणि राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं आयसीएमआरने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करताच अंत्यसंस्कार केले जातात असा मुख्य आरोप या याचिकेत करण्यात आला होता. कोरोनाबाधितांचे मृतदेह लिकप्रूफ बागेत अथवा हायपोक्लोराईट टाकून आणणं गरजेचं असतानाही तशी कोणतीही काळजी इथं घेण्यात येत नाही. यामुळेच स्मशानभूमीतील एका कर्मचा-यालाही कोरोनाची लागण झाली असून अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे उर्वरित कर्मचा-यांवर कामाचा ताण येत असल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला होता.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा या याचिकेतील दाव्यात कोणतही तथ्य नसून मुंबई महानगरपालिकेडून कोविडनं मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पूर्ण काळजी घेतली जाते. तसेच आसपास राहणा-या लोकांचं सार्वजनिक स्वास्थ्य विचारात घेता, आयसीएमआरनं याबाबत आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन केलं जात अशी माहिती प्रतिज्ञापत्रावर हायकोर्टात सादर केली. यावर समाधान व्यक्त करत हायकोर्टानं ही याचिका निकाली काढली.
Coronavirus | मुंबईत कोरोनाच्या चाचण्या नियंत्रित, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना पत्र