एक्स्प्लोर
बाईकचा हप्ता भरण्यासाठी बँकर सिद्धार्थ संघवींची हत्या
चोरीच्या उद्देशाने सिद्धार्थ संघवी यांना आरोपी सर्फराझने चाकूचा धाक दाखवला, मात्र त्यांनी प्रतिकार केल्यामुळे गळा चिरुन हत्या केला.
मुंबई : मुंबईतील मलबार हिल भागात राहणारे एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येप्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. चोरीच्या उद्देशाने संघवी यांना आरोपी सर्फराझने चाकूचा धाक दाखवला, मात्र त्यांनी प्रतिकार केल्यामुळे त्यांची गळा चिरुन हत्या केल्याची माहिती आहे.
मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी 22 वर्षीय सर्फराझ शेखला सोमवारी अटक केली होती. 35 हजार रुपयांचा हप्ता भरण्यासाठी सर्फराझने सिद्धार्थ यांची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. सिद्धार्थ संघवी यांचं कार्यालय असलेल्या कमला मिल भागातील पार्किंग लॉटमध्ये ही हत्या झाल्याची माहिती आहे.
कमला मिल पार्किंग लॉटमध्ये तीन वर्षांपूर्वी सर्फराझ फॅब्रिकेटर म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला या परिसराची चांगलीच माहिती होती. चार महिन्यांपूर्वी तो पुन्हा त्याच ठिकाणी कामाला लागला. बाईकचा हप्ता भरण्यासाठी सर्फराझला 35 हजार रुपयांची निकड होती. त्यामुळे पार्किंग लॉटमध्ये सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही नसल्याचा फायदा घेत त्याने सिद्धार्थ संघवींना लुटण्याचा प्लान त्याने आखल्याचं पोलिसांनी सांगितलं.
संघवींकडे 35 हजार रुपयांची रोकड किंवा तितक्या किमतीच्या वस्तू असतील असा सर्फराझचा कयास होता. सिद्धार्थ संघवी पार्किंग लॉटमध्ये आपल्या गाडीच्या दिशेने जाताने सर्फराझने त्यांना गाठलं आणि सुरीच्या धाकाने त्यांना धमकावलं. सिद्धार्थ आपल्याकडील मुद्देमाल देऊन टाकतील, असा सर्फराझचा समज होता, मात्र संघवींनी प्रतिकार केल्यामुळे तो बावचळला.
सिद्धार्थ संघवींसोबत झालेल्या बाचाबाचीमध्ये सर्फराझने त्यांना भोसकलं. संघवींचा मृतदेह त्याने त्यांच्याच गाडीत मागच्या सीटवर ठेवला. त्यानंतर कल्याणला जाऊन हाजीमलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह फेकला. पुढे ती गाडी घेऊन सर्फराझ नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात आला. तिथे तो राहत असलेल्या परिसरातच त्याने गाडी सोडून दिली. गाडीत सापडलेल्या सुरीनेच सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याची कबुली सर्फराझने दिली आहे.
व्यावसायिक ईर्षेतून सिद्धार्थ संघवी यांची सहकाऱ्यांनी हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी एका महिलेसह चौघा संशयितांना ताब्यातही घेतलं होतं.
सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासोबत राहत होते. बुधवारी (5 सप्टेंबर) रात्री ऑफिस सुटल्यानंतर ते लोअर परेलहून मलबार हिलच्या दिशेने निघाल्याचं म्हटलं जात होतं. ऑफिसमधून बाहेर पडताना त्यांना पाहिल्याचा दावाही वॉचमनने केला होता.
सिद्धार्थ संघवी घरी न पोहचल्याने कुटुंबीय काळजीत पडले. संघवींचा फोन बंद होता. रात्रभर वाट पाहून शोधाशोध केल्यानंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी एन एम जोशी पोलिसात तक्रार दाखल केली. शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात आढळली होती. गाडीत रक्ताचे डागही सापडले होते.
दरम्यान, सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह घेऊन कल्याणपर्यंत जाण्याचा धोका सर्फराझने कसा काय पत्करला, या गुन्ह्यात त्याचे कोणी साथीदार आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement