पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना हायकोर्टाचा दिलासा, 24 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे ईडीला आदेश
विदेशी चलन प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 'ईडी'ने चौकशी करत आहे. त्यासंदर्भात ईडीने अविनाश भोसले यांना समन्स बजावत त्यांच्या 'अबिल हाउस' या कार्यालयावर छापे टाकले होते.
मुंबई : परदेशी विनिमय व्यवस्थापन (फेमा) कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या रडारवर असलेल्या अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलगा अमित यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने ताप्तुरता दिलासा दिला आहे. 24 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत.
विदेशी चलन प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 'ईडी'ने चौकशी करत आहे. त्यासंदर्भात ईडीने अविनाश भोसले यांना समन्स बजावत त्यांच्या 'अबिल हाउस' या कार्यालयावर छापे टाकले होते. मात्र या समन्सला अविनाश भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, 'मी आणि माझा मुलगा अमित ईडीला चौकशीस सहकार्य करण्यास तयार आहोत. ईडीने कोणतीही माहिती न देता कार्यालयावर छापा टाकला. त्यामुळे सुनावणी सुरु असेपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून ईडीला रोखावे तसेच सुरु असलेल्या चौकशीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी भोसले यांच्यावतीने खंडपीठासमोर करण्यात आली. त्यावर आक्षेप घेत भोसले यांना वारंवार समन्स बजावूनही ते कार्यालयात हजर राहिले नाहीत, असा दावा ईडीच्यावतीने बाजू मांडताना अॅड. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात केला. त्याची दखल घेत खंडपीठाने अविनाश भोसले यांना 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. तसेच आपला चौकशी अहवाल पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश ईडीला देत सुनावणी 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी कोणत्या प्रकरणात भोसले यांची चौकशी?
अविनाश भोसले यांनी साल 2007 मध्ये परदेशातून महागड्या वस्तू आणल्याने तसेच परदेशी चलन बाळगल्याने ईडीने फेमा अंतर्गत तेव्हा तपास केला होता. मात्र, आता नेमकी कोणत्या प्रकरणात भोसले यांची चौकशी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :