(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हायकोर्टाच्या नाराजीनंतर हँडवॉशची 'ती' वादग्रस्त जाहिरात महिन्याभरासाठी मागे
व्यावसायिक युद्धात कोरोनाबाबत भीतीचं वातावरण आणखी वाढवू नका शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने साबण आणि हँडवॉश कंपन्यांतील वादाच्या मुद्द्यावर खडे बोल सुनावले. हायकोर्टाच्या नाराजीनंतर महिन्याभरासाठी हँडवॉशची 'ती' वादग्रस्त जाहिरात मागे घेण्यात आली आहे.
मुंबई : 'कोरोना या विषाणूमुळे पसरणाऱ्या कोविड 19 या महाभयंकर रोगाचं जागतिक संकट असताना, लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढवणारी जाहिरात कशी करता?', असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने रेकिट बेंकिसर कंपनीला खडे बोल सुनावले आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या दट्यानंतर अखेर 'ती' वादग्रस्त जाहिरात सर्व टीव्ही वाहिन्या आणि अन्य माध्यमांतून 22 मार्चच्या दुपारी 12 वाजल्यापासून मागे घेण्यात आली. तसेच 21 एप्रिलच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ती प्रसारित केली जाणार नाही, अशी हमी या कंपनीने हायकोर्टात दिली आहे.
"आजारांपासून दूर रहायचे असेल तर साबण नाही तर डेटॉलचे हँडवॉशच वापरायला हवे", असा संदेश एक डॉक्टर आजारी असलेल्या लहान मुलाला देतात, अशा आशयाची ही जाहिरात बऱ्याच कालावधीपासून वाहिन्यांवर सुरु होती. त्यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती के. श्रीराम आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.
जगभरात कोविड 19 चा कहर माजलेला आहे. कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी हात साबण आणि पाण्याच्या सहाय्याने वारंवार धुण्याचा संदेश खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला असताना या कंपनीकडून या वातावरणाचा गैरफायदा घेतला जात आहे. आपल्या जाहिरातीतून साबण काहीच उपयोगाचे नाहीत, असा संदेशच एकप्रकारे या जाहिरातीतून दिला जात आहे. त्यामुळे आधीच धास्तावलेल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन आणखी भीती निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीच्या जाहिरातीने साबण उत्पादकांच्या होणाऱ्या व्यावसायिक नुकसानीचा मुद्दा वेगळा आहे. मात्र, आजच्या घडीला सार्वजनिक हित लक्षात घेता, असा चुकीचा संदेश समाजात पसरवणारी जाहिरात तात्काळ थांबवायला हवी, असा दावा याचिकादारांतर्फे कोर्टापुढे मांडण्यात आला.
मात्र जाहिरातीत दाखवलेला तो साबण आहे याच याचिकादार कंपनीचा असल्याचे कुठेही स्पष्ट होत नाही, असा बचाव संबंधित कंपनीच्या वकिलांनी कोर्टापुढे केला. मात्र, सध्याच्या वातावरणात लोकांच्या भीतीमध्ये भर घालणारी अशाप्रकारची जाहिरात दाखवण्याची गरजच काय? जाहिरात कंपन्यांनी थोडं जबाबदारीने वागायला नको का?, असा सवाल उपस्थित करत हायकोर्टाने संबंधित कंपनीची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर महिन्याभरासाठी ही जाहिरात तूर्तास मागे घेण्याची तयारी संबंधित कंपनीने हायकोर्टापुढे दर्शवली.
Coronavirus | हात धुण्याची योग्य पद्धत कशी? डॉ. सुकुमार सरदेशपांडे यांचं मार्गदर्शन