(Source: Poll of Polls)
EXCLUSIVE | एच के पाटील यांची थोरात आणि चव्हाणांशी चर्चा, काँग्रेसच्या बैठकीत काय काय झालं?
बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसच्या या बैठकीत काय काय झालं?
मुंबई : बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर आता पक्षाचे प्रभारी एच के पाटील दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी मंगळवारी (5 जानेवारी) रात्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोघांशी सह्याद्री गेस्टहाऊसवर स्वतंत्रपणे चर्चा केली. अशोक चव्हाण यांच्यासोबत होणारी चर्चा काल चर्चा होऊ शकली नाही. ती आज सकाळी नऊ वाजता होणार आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी जवळपास तासभर महाराष्ट्र प्रभारींसोबत खलबते केली. सध्याची व्यवस्था कायम ठेवा, लगेच बदलांची गरज नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. तसंच काही सूचना देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या.
तर बाळासाहेब थोरात आणि एच के पाटील यांच्यातील चर्चा पंधरा मिनिटे चालली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबत बाळासाहेब थोरात या बैठकीत ठाम होते. "चांगला पर्याय शोधा, आम्ही पाठीशी राहू," असं थोरात यांनी प्रभारींना सांगितलं आहे.
"जर बदल होणार असेल तर पक्षाला बिगर मराठा चेहरा देण्याची गरज आहे," अशी महत्त्वाची सूचनाही कालच्या बैठकीत समोर आल्याचं समजतं.
दरम्यान आज सकाळी नऊ वाजता एच के पाटील आणि अशोक चव्हाण यांच्यात चर्चा होणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता काँग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेते-मंत्र्यांसोबत चर्चा केली जाईल आणि मग दुपारी चार नंतर एच के पाटील राज्यातील आमदारांना भेटून त्यांची मतं जाणून घेणार आहेत.
बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटल्यानंतर आता राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, नाना पटोले यांची नावं प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
संबंधित बातम्या