(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Balasaheb Thorat | बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. थोरात आज दिल्लीत असून ते पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं समजतं.
मुंबई : बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी ही भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे. थोरात आज राजधानी दिल्लीत असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं समजतं. आता काँग्रेस हायकमांड बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर कोणती भूमिका घेणार हे पाहावं लागेल.
काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ नेता अशी दोन पद होतं. शिवाय महाविकास आघाडी सरकारमध्येही ते महसूल मंत्री आहेत. यातून महाराष्ट्रतील काँग्रेसचे काही नेते सतत दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्ष बदलावे यासाठी हायकमांडकडे लॉबिंग करत होते अशी चर्चा होती.प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी आणि त्यावरुन दिल्लीत होणारी चर्चा यामुळे अखेरीस बाळासाहेब थोरात यांनी स्वतःहून पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.
आधीही दोन वेळा प्रदेशाध्यक्ष सोडण्याची तयारी दरम्यान याआधीही अशाच चर्चांमुळे बाळसाहेब थोरात यांनी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यांनी दिल्लीच जाऊन तसं कळवलं देखली होतं. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या मुंबईत दौऱ्यातही थोरात यांनी त्यांच्यासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मानसिकता बोलून दाखवली होती.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात आणि काँग्रेसने याला पाठिंबा द्यावा यात बाळासाहेब थोरात यांनी मोठी भूमिका बजावली होती. तसंच त्यांच्याच नेतृत्त्वात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक होती. परंतु प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणीमुळे थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचं ठरवलं असं सांगितलं जात आहे.
प्रदेशाध्यक्षपदी कोण? प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर या पदासाठी कोणाची वर्णी लागणार याचीही चर्चा सुरु आहे. काँग्रेसप्रदेशाध्यक्षपदी राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत असल्याचं समजतं. याबाबतचा निर्णय या महिन्यातच अपेक्षित आहे.