मोठी बातमी | मुंबईत 26 जानेवारीपूर्वी शाळा सुरु होण्याची शक्यता
कोरोना व्हायरसचं संकट बळावत असल्याचं पाहता देशभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, आता बहुतांश शाळा टप्प्याटप्प्यानं सुरु करण्यात येत आहेत.
मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट बळावत असल्याचं पाहता देशभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, आता बहुतांश शाळा टप्प्याटप्प्यानं सुरु करण्यात येत आहेत. आता मुंबईतही शाळा 26 जानेवारी 2021 पूर्वी सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शाळा सुरु करण्यासंबंधीचा प्रस्ताव पालिका शिक्षण विभागानं आयुक्तांकडे सादर केला आहे. ज्यावर मंगळवारी निर्णय होऊ शकतो. मागील काही दिवसांपासून कमी होणारी रुग्णसंख्या आणि नव्यानं सापडणाऱ्या रुग्णांचं लक्षणीयरित्या कमी होण्याचं प्रमाण पाहता यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, कोरोना काहीसा नियंत्रणात येत असल्याचं पाहता येत्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये शाळा सुरु होणार असल्याचं चित्र आहे.
मागील बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चा आणि बंद असणाऱ्या शाळा यावर आता तोडगा निघणार आहे. असंख्य पालक आणि विद्यार्थ्यांचं याच निर्णयाकडे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, 15 जानेवारीपर्यंत शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे. असं असलं तरीही अंतिम निर्णय पालिका आयुक्त घेणार आहेत.
यापूर्वीच सुरु होणार होत्या शाळा
23 नोव्हेंबरलाच मुंबई विभागातील शाळा सुरु होणार होत्या. पण, नोव्हेंबर महिन्यातच कोरोनाची परिस्थिती पाहत हा निर्णय़ पुढं ढकलण्यात आला. असं असलं तरीही काही जिल्ह्यांतील शाळा 4 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
शाळा सुरु होण्याच्या बाबतीतील निर्णय़ हा कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या आणि शिक्षण विभागाची तयारी यावर अवलंबून असणार आहे. त्या दृष्टीनं सर्व सोईसुविधांची उपलब्धता लक्षात घेत यंत्रणा सज्ज असल्याचं लक्षात येत आहे.
पुण्यातील शाळा 4 जानेवारीला सुरु होणार का?
इथं मुंबईत शाळा सुरु होण्यासाठी सकारात्मक चर्चा पाहायला मिळत असताना पुण्यात मात्र 4 जानेवारीला शाळा सुरु होणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. पालकांचं हमीपत्र आल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.