राजकारण, यंत्रणांचा गैरवापर यात गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही : संजय राऊत
देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान हे केवळ निवडणुका आणि राजकारण यात गुंतून पडलं आहेत. त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे काश्मीरमधील प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : कश्मीरमधील दहशतवाद संपूर्णपणे नष्ट होईल, असं सांगणारं केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचे, जवानांचे आणि अनेक मुस्लीम पोलीस अधिकाऱ्यांचं रक्षण करु शकत नाही. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री केवळ निवडणुका आणि राजकारणात गुंतले आहेत, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तसंच फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले आणि ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर यांच्यात गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही, असंही राऊत म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.
काश्मीरबाबत काय म्हणाले?
कलम 370 चा विषय नाही किंवा जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला म्हणून देखील काही फरक पडलेला नाही. काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले आहेत आणि सामुदायिक स्थलांतर करण्याचा संदर्भात त्यांनी सरकारला सूचना केली आहे. केंद्रातले सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी आणि प्रखर राष्ट्रवादी आहे. काश्मिरी पंडित यांच्या घरवापसीबाबत आग्रही असलेले सरकार आहे. काश्मीरमधील दहशतवाद संपूर्णपणे खतम होईल असे सांगणारे सरकार आज काश्मीरमध्ये आमच्या काश्मिरी पंडितांचं, जवानांचं आणि अनेक मुस्लिम पोलीस अधिकारी जे या देशाची सेवा करत आहेत, त्यांचं रक्षण करु शकत नाहीत. देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान हे केवळ निवडणुका आणि राजकारण याच्यामध्ये गुंतून पडलं आहेत. त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे काश्मीरमधील प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे. दुर्दैवाने फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले आणि ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर यांच्यात गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही, हे दुर्दैवी आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आमची देणी द्या, महाराष्ट्राला गरज : संजय राऊत
केंद्र सरकारने 31 मे रोजी महाराष्ट्रासह 21 राज्यांना जीएसटी परतावा दिला. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक 14 हजार 145 कोटी रुपये मिळाले. परंतु केंद्राकडून 15 हजार कोटी रुपये येणं अजूनही बाकी असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की,
"या संदर्भात अर्थमंत्री बोलतील किती पैसे आले आणि किती पैसे यायचे आहेत. पण आमची देणी द्या महाराष्ट्राला त्याची गरज आहे."
पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये : दानवेंना राऊतांचं प्रत्युत्तर
ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी दुर्बिणीने शोधून देखील शिवसैनिक सापडला नाही, असं भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले. यावर संजय राऊत म्हणाले की, "दुर्बिणीने ते काय काय बघतात हे पाहावं लागेल. त्यांच्याकडे दुर्बिणी लावल्या म्हणूनच बाबरी पडत असताना पळून गेले आणि शिवसैनिकांनी पाडली अशा प्रकारचे सत्य कथन भाजपच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर पडले, पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये."
हार्दिक पटेल यंत्रणेचा बळी : संजय राऊत
भाजपविरोधी भूमिका घेऊन राजकारणात आलेल्या हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. याविषयती संजय राऊत यांनी भाष्य केलं. "हार्दिक पटेल यांनी आपल्या स्वतःच्या भूमिका पडताळून पाहायला हव्यात. भाजपने देशद्रोही या शब्दाची व्याख्या त्यांच्याविषयी केली होती, ती काय होती. अर्थात असे अनेक मासे त्यांच्या गळाला लागत असतात. खोट्या केसेस, सत्तेचा गैरवापर यांच्यामार्फत दबाव आणले जातात. हार्दिक पटेल सुद्धा त्याच एका यंत्रणेचा बळी आहे," असं संजय राऊत म्हणाले.