(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर, अटी-शर्तींसह एसटी प्रवास शक्य
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. नियम आणि अटींचं पालन करुन चाकरमान्यांना एसटीने प्रवास करता येणार आहे.
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणी राहणाऱ्या चाकरमान्यांना एसटीने कोकणात प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी काही नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली.
अनिल परब यांच्या नेतृत्त्वाखाली कोकणातल्या आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीत गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात कसे जाणार? यावर चर्चा झाली. मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार चाकरमान्यांना कोकणात सुखरुप पाठवणार आणि आणणार असं आश्वासन अनिल परब यांनी दिलं. तसंच कोकणातल्या चाकरमान्यांवरुन कोणीही राजकारण करु नये, असा टोलाही अनिल परब यांनी विरोधकांना लगावला.
अनिल परब म्हणाले की, "मुंबई, एमएमआर, पुण्यातून किंवा इतर ठिकाणाहून चाकरमानी कोकणात जातील. याचा विचार करुन आम्ही आयसीएमआर तसंच आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना मागवल्या आहे. राज्य सरकारही यावर काम करत आहे. कोकणात गणेशोत्सव साधेपणाने कसा साजरा होईल? कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. यासगळ्याचा विचार करुन मुख्यमंत्री निर्णय घेतील. परंतु त्या संदर्भात आमची तयारी सुरु आहे. ज्यांची घरं बंद आहेत, ज्यांना गावाला जाऊन घरं उघडावी लागणार आहे, त्यांच्यासाठी एसटीची सेवा दिली जाईल. मात्र अटीशर्तींचं पालन करुन या गोष्टी उपलब्ध होतील."
क्वॉरन्टाईन कालावधीवरुन पुन्हा गोंधळ गणेशोत्सव जवळ आल्याने कोकणात आता क्वॉरन्टाईनवरुन पुन्हा एकदा गोंधळ सुरु झाला आहे. क्वॉरन्टाईनचा कालावधी 14 वरुन 7 दिवसांचा करावा, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर विरोधी पक्ष भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी क्वॉरन्टाईन कालावधी असूच नये, अशी मागणी केली आहे. मात्र 14 दिवसाचा क्वॉरन्टाईन कालावधी हवाच अशी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची ठाम भूमिका आहे. यामुळे इथे आड तिथे विहिर अशी अवस्था चाकरमान्यांची झाली आहे. कोकणातील गणेशोत्सवावर देखील कोरोनाचं सावट; आरती, भजन, चाकरमान्यांसाठी नियमगणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना एस टीनं कोकणात जाता येणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची मोठी घोषणा @abpmajhatv pic.twitter.com/assGgXQFXW
— Vaibhav Suresh Parab (@vaibhavparab21) July 20, 2020
गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना क्वॉरन्टाईनच्या मुद्यावरुन मतमंतातरे असताना आता ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन स्थानिक पातळीवर 14 दिवसांचाच क्वॉरन्टाईन कालावधी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी चाकरमान्यांना 7 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. सात ऑगस्टपर्यंत तुम्ही या, चौदा दिवस क्वॉरन्टाईन व्हा आणि मगच गणेशोत्सव साजरा करा, असा नियम घालून दिला आहे. कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने तर 7 तारखेनंतर येणाऱ्या चाकरमान्यांना एक हजार रुपयांचा दंडच आकारला आहे. पाच ते दहा टक्के चाकरमान्यांनासाठी आम्ही पूर्ण गावातील लोकांच आरोग्य धोक्यात टाकू शकत नसल्याचं येथील सरंपचांच मत आहे. सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी 14 दिवस क्वॉरन्टाईन आणि उशिरा येणाऱ्यांना एक हजार दंड असा निर्णय आपण बैठकीत घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
Ganeshotsav 2020 | नियमांचं पालन करुन चाकरमान्यांना एसटीने कोकणात जाता येणार : अनिल परब