एक्स्प्लोर
कोकणातील गणेशोत्सवावर देखील कोरोनाचं सावट; आरती, भजन, चाकरमान्यांसाठी नियम
कोकणातील गणेशोत्सवावर देखील आता कोरोनाचं सावट दिसू लागलं आहे. कारण, मोठ्या थाटात, जल्लोषात साजरा केला जाणारा कोकणातील गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय आता गावकरी करताना दिसत आहेत.
रत्नागिरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशासह राज्यात देखील लॉकडाऊन अद्याप देखील सुरूच आहे. याचा परिणाम अनेक उद्योगधंद्यांवर देखील झाला आहे. शिवाय, मार्चपासून आलेले सण देखील अत्यंत साधेपणानं साजरे केले गेले. त्यानंतर आता या कोरोनाचा परिणाम गणेशोत्सवावर देखील होताना दिसत आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध मंडळांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोकणातील गणेशोत्सवावर देखील आता कोरोनाचं सावट दिसू लागलं आहे. कारण, मोठ्या थाटात, जल्लोषात साजरा केला जाणारा कोकणातील गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय आता गावकरी करताना दिसत आहेत.
आरती, भजन आणि मुंबई-पुण्यासह आपल्या कोकणातील मूळ गावी येणाऱ्या चाकरमान्यांना देखील काही नियम आखून दिले जाणार आहेत. त्याचं पालन करणं हे सर्व चाकरमान्यांना बंधनकारक असणार आहे. यामागे केवळ एकच उद्देश तो म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणं. कारण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आता कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना काही नियम आखून दिले जात आहेत. शिवाय, दोन्ही जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती याबाबतचा ठराव देखील करताना दिसून येत आहेत.
चाकरमान्यांना काय असणार नियम?
गणेशोत्सव आणि कोकण याचं नातं सर्वांना ठाऊक आहेच. अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या कोकणी माणूस बाप्पा घरी विराजमान होणार म्हटल्यावर आपल्या कोकणातील मुळगावी येतो. कोकणात घरोघरी बाप्पाचं आगमन होतं. विद्युत रोषणाई आणि बाप्पाचं गुनगाण गाणाऱ्या गाण्यांनी सारं वातावरण प्रसन्न तर होतं शिवाय, भारावून देखील जातं. गजानन घरी विराजमान झाल्यापासून ते अगदी पाच दिवस ते एकवीस दिवस बाप्पाचं विसर्जन होईपर्यंत घरांघरांमध्ये भजन आणि आरतीचे सूर ऐकू येतात. गणरायाच्या नैवेद्यासाठी होणारी लगबग तर काय विचारता. अगदी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत भजनाचे सूर ऐकू. ढोलकी, मृदुंगावर पडणारी थाप कानी पडते.
मुंबई, पुणे किंवा जगाच्या पाठीवर कुठंही असला तरी कोकणी माणूस घरी येतो आणि विघ्नहर्त्याला जल्लोषात आपल्या घरी आणतो. त्याच्या मिरवणुकीचा थाट तर काय वर्णावा! पण, यावर यंदा मर्यादा येणार आहेत. आरती, भजनं आणि मिरवणुका किती मोठ्या प्रमाणात निघतील याबाबत देखील आता शंका निर्माण झाली आहे. कोरोनाच्या वाढच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकानं आपल्या घरी किंवा शक्य झाल्यास दोन घरांनी एकत्र येत लंबोदराची आरती करावी आणि भजन करावं असा मतप्रवाह आता पुढे येत आहे. शिवाय, चाकरमान्यांनी गावी येताना किमान गावी आल्यानंतर 14 दिवसांचा क्वारंटाईनचा नियम पूर्ण करावा. विसर्जनावेळी निघणारी मिरवणूक शक्यतो रद्द करत अत्यंत साधेपणानं विसर्जन व्हावे याबाबत आता गंभीरपणे विचार सुरू झाला आहे. गावातील जाणकार याबाबत आता पुढाकार घेताना दिसत आहेत. केवळ कोरोनाला रोखणं हाच यातील उद्देश असून आता आपल्या लाडक्या बाप्पाचा सण साधेपणानं साजरा करताना कोकणी माणूस आपल्या मनाला देखील मुरड घालणार आहे.
मूर्तीशाळांमध्ये देखील निर्माण होत आहेत समस्या!
अवघ्या दीड महिन्यांवर गणपती बाप्पाचं आगमन येऊन ठेपलं आहे. पण, सध्या शाडूची माती मिळवताना देखील मूर्तीकारांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय रंग देखील वेळेवर उपलब्ध होतील की नाही याबाबत देखील शंकाच आहे. दुकानं बंद असल्यानं लाखो, करोडोंची उलाढाल ठप्प झाली आहे. तसंच आता सर्व व्यवहार आणि कामधंदे देखील ठप्प असल्यानं मूर्तीकारांना देखील आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय, अनेकांनी मूर्ती लहान साकारा अशी सुचना देखील मूर्तीकारांना केली आहे. त्यामुळे कोकणातील गणेशोत्सवावर देखील कोरोनाचं संकट असून जगावरचं संकट टळू दे, पुढच्या वर्षी मोठ्या जल्लोषात आणि दिमाखात तुझं स्वागत करू असं गाऱ्हाणंचं कोकणी माणूस विघ्नहर्त्यासमोर आतापासूनच घालत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement