घाटकोपर विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी सीबीआय आणि हवाई वाहतूक मंत्रायलायाला नोटीस पाठवून यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.
![घाटकोपर विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल ghatkoper plane crash : petition file in high court for inquiry घाटकोपर विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/28144227/Ghatkopar-plane-crash-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय आणि हवाई वाहतूक मंत्रायलायाला नोटीस पाठवून यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळील फनेल क्षेत्रातील उंच इमारतींविरोधात याचिका करणाऱ्या यशवंत शेणॉय यांनीच ही याचिका नव्यानं दाखल केली. दरम्यान खरंच मुंबई हवाई दुर्घटनेच्या दृष्टीनं सुरक्षित आहे का? असा सवालही या याचिकेतून विचारण्यात आला आहे.
घाटकोपर विमान दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू
घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात 28 जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास चार्टर्ड विमान कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील चार जण आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.
पायलट मारिया झुबेरी, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.
चाचणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास जुहू हेलिपॅडवरुन या विमानाने उड्डाण केलं. मात्र घाटकोपरपर्यंत पोहोचताच दुर्घटनाग्रस्त झालं आणि भर वस्तीत कोसळलं.
हे विमान उत्तर प्रदेश सरकारचं होतं. या विमानाला अलाहाबादमध्ये 2013 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हे विमान 2014 मध्ये मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनला विकलं होतं. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का हे तपासण्यासाठी चाचणी घेण्यात येत होती. त्यावेळी विमान दुर्घटनाग्रस्त झालं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)