22 वर्षीय मुलीच्या लग्नाची इच्छा अपूर्ण, पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग अपघातातील मृतांची संख्या 14 वर गेली असून 74 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
मुंबई : दाटून आलेले कंठ, अश्रू वाहून कोरडे पडलेले डोळे अन् आपलं जिवाभावाचं माणूस गेल्याने आयुष्यात आणि अख्ख्या भवतालात आलेलं रितेपण. ही परिस्थिती आहे, घाटकोपर दुर्घटनेत आपली जीवाभावाची माणसं गमावलेल्या कुटुंबियांची. मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातातील मृतांची संख्या 14 वर गेली असून 74 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं. या दुर्घटनेमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
घरी मुलीच्या लग्नाची तयारी, वडिलांवर काळाचा घाला
वरळीच्या बशीर अहमद असिक अली शेख टॅक्सी चालवून कुटुंबाचं पोट भरत होते. 22 वर्षीय मुलीच्या लग्नाचा विचार त्यांच्या मनात होता गेल्या काही दिवसांपासून मुलीचं लग्न करायल हवं, असं त्यांनी घरच्यांसमोर बोलून दाखवल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. पण मुलीचं लग्न करण्याची त्यांची ही इच्छा मनातच राहिली आणि वडिलांवर काळाने घाला घातला. बशीर अहमद सीएनजी भरण्यासाठी घाटकोपरच्या पंतनगरच्या पेट्रोल पंपावर गेले आणि ते परत आलेच नाहीत. त्यांच्या अंगावर होर्डिंग पडलं आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर.
पत्नी आणि चिमुकल्या मुलाचा आधार हरपला
ज्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं, त्याच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सचिन यादव यांच्यावरही काळाने घाला घातला आहे. सचिन यादव यांची शिफ्ट बदलली आणि बरोबर चार वाजता ते कामावर हजर झाले आणि इतक्यात होर्डिंग कोसळून त्यांचा जीव गेला. आता त्यांची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलाचा आधार हरपला आहे.
घाटकोपरच्याच कामरान नगरचे रहिवासी असलेले 48 वर्षीय मोहम्मद अक्रम रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. त्यांचा या दुर्घटनेत बळी गेला आहे. त्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलीसह चार भावांचा आधार हरपलाय.
जीव गेलाय त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा काय दोष?
होर्डिंगला परवानगी कशी दिली, ते नियमानुसार लावलं होतं का? आणि आता या प्रकरणात कुणाला आणि कधी शिक्षा होईल? हे प्रश्न तर आहेतच, पण सोबतच ज्यांच्या जीव गेलाय त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यात काय दोष? हा खरा प्रश्न आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :