Gautam Adani : गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्वर ओकवर एक तास चर्चा
Gautam Adani Meet Sharad Pawar : एकीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस गौतम अदानी यांच्यावर टीका करत असताना दुसरीकडे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली.
मुंबई: उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी अदानी गुरूवारी रात्री पावने नऊ वाजता पोहोचले आणि या दोघांमध्ये सुमारे एक तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
एकीकडे धारावीचा मुद्दा उद्धव ठाकरे गटाकडून महत्त्वाचा केला जात असताना दुसरीकडे आदानी आणि शरद पवार भेट झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. या आधीही शरद पवार आणि गौतम अदानी यांची अनेकदा भेट झाली आहे. पण आता अदानींनी अचानक पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
शरद पवारांकडून अदानींचे नेहमी कौतुक
एकीकडे इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि इतर काही पक्ष उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करत असताना दुसरीकडे त्याच आघाडीचे घटक असलेल्या शरद पवारांनी मात्र आपली भूमिका कायम ठेऊन अदानींची पाठराखण केली आहे. देशातील उद्योग विकासामध्ये गौतम अदानींचं मोठं योगदान असून असल्याचं शरद पवारांनी या आधीही सांगितलंय. तसेच गौतम अदानी यांची संसदेच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून चौकशी करा या राहुल गांधीच्या मागणीलाही त्यांनी विरोध केला होता.
देशातील सर्व प्रमुख उद्योगपतींचे आणि शरद पवारांचे संबंध चांगले आहेत. अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर या प्रमुख उद्योगपतींनी शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केल्याचं समोर आलं आहे. गौतम अदानी यांनीही याआधी अनेकदा शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली, त्यांचा सल्लाही घेतल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे एकीकडे काँग्रेसकडून अदानी यांच्यावर टीका सुरू असताना दुसरीकडे शरद पवारांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवल्याचं दिसून येतंय.
उद्धव ठाकरे यांचा धारावीत मोर्चा
धारावीचे पुनर्विकासाचे कंत्राट हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीला मिळालं आहे. त्यानंतर धारावीकरांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीत मोर्चा काढला आणि त्यांनी अदानी तसेच भाजपवर जोरदार टीका केली. गरज पडली तर मुंबईच काय तर आख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन. ज्यांनी धारावीची सुपारी घेतलीय त्यांनी समजून घ्यावं हा अडकित्ता आहे, त्यानं ठेचलं तर पुन्हा नाव घेणार नाही असा इशारा त्यांनी भाजपला दिला. जे व्यवसाय गुजरातला गेले ते धारावीत परत आणा, सुरतला नेलेले आर्थिक केंद्र धारावीत झालं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
ही बातमी वाचा: