Ganeshostav 2023 : 'अन्नदान हेच श्रेष्ठ दान'! मुंबईतील डिलाईल रोडच्या पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाकडून बहुमूल्य संदेश देणारा देखावा
Ganeshostav 2023 : मुंबईत सध्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. तर गणेशोत्सवामुळे समाजप्रबोधनाचे काम देखील अनेकांकडून करण्यात येत आहे.
मुंबई : भारत (India) हा कृषीप्रधान देश आहे. तरीही दिवसाला 25 लाख लोक अन्नासाठी दारोदार फिरत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. इतर सामाजिक आणि आर्थिक गरजा सोडवण्याआधी सरकारनं आधी प्रत्येक नागरीकाला दोनवेळच किमान जेवण कसं मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं नेहमी सांगण्यात येतं. मुंबईच्या डिलाईल रोड परिसरातील पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshostav) मंडळानं याच विषयावर उभारलेला यंदाचा देखावा अतिशय बोलका आहे.
माणसाच्या मूलभूत गरजा विचारात घेता अन्न ही सर्वात महत्वाची गरज मानली जाते. त्यामुळे आपण अन्नाला पूर्णब्रह्म असं देखील संबोधतो. अन्नाचा एक कण तयार करण्यासाठी कमीत कमी 145 दिवस लागतात. पण तो कण वाया घालवण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो. आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून जागतिक पातळीवर नावाजला जातो. तरी देखील कुपोषण, बालकांचे मृत्यू , उपासमारीची वेळ येणं यांसारख्या संकटांवर आपण अजूनही विजय मिळवू शकलो नाही. हीच खंत अनेकांकडून व्यक्त केली जाते. याच समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळानं यावर्षी अन्नदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा देखावा उभारला आहे.
'अन्नदान हेच श्रेष्ठदान'
आजवर या मंडळानं आपली सामाजिक बांधिलकी जपत वेगवगेळ्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं काम करत असतात. तर आपल्या सामाजिक कार्यातून जनसेवेचा वसा जपण्याचा प्रयत्न देखील या मंडळाकडून करण्यात येतो. यावर्षी या मंडळाने आपल्या गणपती देखाव्यातून 'अन्नदान हेच श्रेष्ठ दान' हा विषय घेतला आहे. त्याच माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम मंडळाकडून करण्यात येत आहे.
याची सुरुवात मंडळानं मणिपूर येथील नागरिकांना अन्नदान करून केली आहे. मणिपूरमधील परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडून हा सुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. तर मणिपूरमधील परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी यासाठी बाप्पाकडे साकडं देखील घालण्यात आलं आहे. आज या मंडपात ज्या ज्या वस्तू पाहायला मिळत आहेत त्या देखील मणिपूर येथिल नागरिकांना वाटण्यात येतील. मंडळाचा हाच उद्देश आहे की आपल्या देशातील कोणताही नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहू नये.
मंडळाच्या या उपक्रमाचं सध्या सगळीकडून कौतुक केलं जात आहे. सण आणि उत्साहासह समाजप्रबोधनाचं कार्य हाती घेतलं आहे. मुंबईतील गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून नागरिक येत असतात. त्यामुळे या नागरिकांना या देखाव्याच्या माध्यमातून संदेश देखील देण्यात येत आहे.