उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने शिवसैनिकांनी हिरामणी तिवारीला चोप दिला होता. नुसती मारहाण नाही तर भर चौकात त्याचे केस कापून मुंडन करण्यात आलं होतं. मुंबईतील वडाळ्यात ही घटना घडली होती.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुक आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. हिरामणी तिवारी यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. चार शिवसैनिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. समाधान जुगधर, प्रकाश हसबे, श्रीकांत यादव आणि सत्यवान कोळंबेकर या शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. वडाळा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
हिरामणी तिवारी या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी चारही शिवसैनिकांवर आयपीसी कलम 143, 147, 149, 323, 325, 342, 504, 506, 596 (2) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या मारहाणीविरोधात आवाज उठवला होता. किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर शिवसैनिकांच्या अटकेची माहिती दिली आहे.
हिरामानी तिवारी प्रकरणा मध्ये वडाळा टीटी पोलिसांनी केली चौघांना अटक. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेसबुक वर हिरामनी तिवारी यांनी पोस्ट केली होती ज्या नंतर स्थानिक शिवसैनिकानी हिरामानी तिवारी यांना मारहाण करून त्यांची टक्कल केली होती @abpmajhatv @ShivSena @MumbaiPolice @BJP4India
— Ganesh Thakur (@7_ganesh) December 26, 2019
काय आहे हे प्रकरण?
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने शिवसैनिकांनी हिरामणी तिवारीला चोप दिला होता. नुसती मारहाण नाही तर भर चौकात त्याचे केस कापून मुंडन करण्यात आलं होतं. मुंबईतील वडाळ्यात ही घटना घडली होती. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत होता.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. जामिया विद्यापीठातील हिंसाचार जालियनवाला बाग हिंसाचाराची आठवण करुन देणारा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात वडाळ्यात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीने फेसबूक पोस्ट लिहिली होती. मात्र त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी मात्र कायदाच हातात घेतला होता.
संंबंधित बातम्या