(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pradeep Sharma: रचलं, पेरलं तेच उगवलं; प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?, जाणून घ्या!
अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला.
मुंबई: मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना २००६ साली झालेल्या कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा सहकारी राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या एन्काउंटर प्रकरणात मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २००६च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवारी) मोठा निर्णय दिला आहे. लखन भैय्या एन्काउंटर प्रकरण बनावट असल्याचं न्यायालयाने निर्णयात म्हटलं आहे.
Bombay HC sentences former policeman Pradeep Sharma to life imprisonment in 2006 fake encounter of gangster Chhota Rajan's close aide
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2024
नेमकं प्रकरण काय?
मुंबईत ११ नोव्हेंबर २००६ रोजी वर्सोव्याच्या नाना-नानी पार्कजवळ रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास डी. एन. नगर आणि जुहू पोलिसांनी संयुक्तरित्या रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांना चकमकीत ठार केलं होतं. मात्र नंतर ही चकमक बनावट असल्याचं विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत उघड झालं होतं. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील तब्बल १३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये प्रदीप शर्मा यांचाही समावेश होता.प्रदीप शर्मा यांनी या एन्काउटरचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे प्रदीप शर्मा यांनी जे रचलं, पेरलं तेच उगवल्याचं बोललं जात आहे.
२०१३मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात १३ पोलिसांसह २१ जणांना दोषी ठरवले आणि सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर लखन भैय्याचा भाऊ आणि वकील राम प्रसाद गुप्ता यांनी प्रदीप शर्माच्या निर्दोष सुटकेविरोधात अपील दाखल करून दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला होता. त्यानंतर आज न्यायलयाने निर्णय देत प्रदीप शर्मा यांना जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे.
प्रदीप शर्मा यांची कारकिर्द काय?
- प्रदीप शर्मा १९८३मध्ये पोलीस दलात दाखल झाले.
- प्रदीप शर्मा यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त राहिली.
- प्रदीप शर्मा यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख
- लखन भैय्या बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध प्रकरणात २००८मध्ये निलंबित
- २०१९मध्ये शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र प्रदीप शर्मा यांचा दारुण पराभव झाला होता.
- अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.