(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चाकूचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या पाच जणांना अटक; डोंबिवली पोलिसांची कारवाई
सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या चार दिवसात सापळा रचत या आरोपींना अटक करण्यात डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे.
डोंबिवली : चाकूचा धाक दाखवित पाच जणांनी एका बँक कर्मचाऱ्याला लुटण्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील ठाकूर्ली परिसरात 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले होते. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरु केला .सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पाच जणांना सापळा रचत अटक केली आहे. आशु दुमडा, कुणाल बोध, विशाल जेठा, सलमान पुहाल, गणेश लोट अशी या आरोपीची नावे आहेत.
मुंबईतील एका खाजगी बँकेत कामाला असलेले संतोषकुमार शर्मा हे डोंबिवली पूर्व भागातील ठाकूर्ली परिसरातील चामुंडा गार्डनमध्ये राहतात. 25 डिसेंबरच्या मध्य रात्री एक वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान संतोष कुमार रस्त्याने घरीत असताना मास्क परिधान केलेल्या चार ते पाच तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. या चोरट्यांनी संतोषकुमारला घेरले. त्याच्या गळयावर चाकू लावून त्यांच्याकडील दोन लॅपटॉप, महागडा मोबाईल एटीएम आदी सर्व घेऊन पसार झाले. या याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे रामनगर पोलिसांनी त्रिमुर्तीनगर वसाहतीमधील वाल्मीक वस्तीमधील मंदिराच्या पाठिमागील तबेल्याजवळ सापळा रचत आशु दुमडा, कुणाल बोध, विशाल जेठा, सलमान पुहाल, गणेश लोट पाचही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या पाचही आरोपींना आज कल्याण न्यायालयात हजर केले असता 30 तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, डोंबिवली ठाकुर्लीला जोडणाऱ्या नाईंटी फिट रोड परिसरात या आधी देखील अशा घटना घडल्या असून या ठिकाणी पोलीस चौकीची मागणी केली जात आहे. याबाबत या ठिकाणी पोलीस चौकीची प्रक्रिया सुरू असल्याचं एसीपी जे डी मोरे यांनी सांगितलं
महत्त्वाच्या बातम्या :