Parambir Singh : परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, 15 कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, 15 कोटींच्या खंडणीप्रकरणी मुंबईतील मरिन लाईन्स पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील इतर पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील एका बांधकाम व्यासायिकाने हा गुन्हा दाखल केला आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. एवढंच नाहीतर परमबीर सिंह 2015 ते 2018 या कालावधीत बदलीनंतर जे घर वापरत होते, त्यासंदर्भातही त्यांना 24 लाखांचा दंडही आकारण्यात आला आहे.
ठाण्यातील एका व्यावसायिकाने परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये परमबीर सिंह यांच्यासह इतर पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एफआयआरमध्ये आठ जणांची नावं आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
परमबीर सिंह 2015 ते 2018 या कालावधीत बदलीनंतर जे घर वापरत होते, त्यासाठी 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परमबीर सिंह यांना 18 मार्च 2015 रोजी ठाणे पोलीस आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. यापूर्वी ते मुंबईत स्पेशल रिझर्व पोलीस फोर्सचे अॅडिशनल डीजीपी होते. परमबीर सिंह यांना मलबार हिल्स येथील नीलिमा अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी घर देण्यात आलं होतं. परंतु, ठाण्यात पोस्टिंग झाल्यानंतरही त्यांनी राहतं घर खाली केलं नव्हतं. 17 मार्च, 2015 ते 29 जुलै 2018 पर्यंतचं भाडं आणि दंड असं एकत्र करुन त्यांच्यावर 54.10 लाख रुपयांची थकबाकी होती. यापैकी 29.43 लाख रुपये परमबीर सिंह यांनी भरले आहेत. तर 24.66 लाख रुपये भरणं अद्याप बाकी आहे. दरम्यान, बदलीनंतर 15 दिवसांचा अवधी सरकारी निवासात राहण्याची परवानगी देण्यात येते. पण वेळीच घर खाली केलं नाही, तर मात्र दंड भरावा लागतो. परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवरील लेटरबॉम्ब प्रकरण होण्यापूर्वी सर्व थकीत दंडाची रक्कम माफ करण्याची विनंती केली होती.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांच्या लेटबॉम्बनंतर पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
