हक्काच्या घरांसाठी पोलीस परिवारानं उभारला लढा, मनसेचा लेखी पाठिंबा
पोलीस परिवारानं पुढाकार घेऊन 'घरं नाही तर, मतं नाही' ही नवी चळवळ सुरू करून पावले उचलली आहेत. त्यानिमित्ताने आयोजित बैठकीत आज सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.
मुंबई : उत्तर प्रदेश, बिहारमधील परप्रांतियच नव्हे तर बांगलादेशीसुद्धा मुंबईत येऊन झोपड्या बांधतात आणि त्यांच्याही झोपड्या नावावर होतात, मग पोलीसांच्या नावावर घरं का होत नाहीत? जोपर्यंत बीडीडी चाळीतील घरं पोलिसांच्या नावांवर होत नाहीत तोवर हक्कांच्या घरांसाठी सुरू असलेला पोलीस परिवाराचा लढा सुरूच राहिल, असा निर्धार आज सर्वांनी घेतला. एवढेच नव्हे तर पोलीसांच्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा ताटकळत पडलेला प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मतदान करणार नसल्याचीही भूमिका पोलीस परिवारानं घेतली. हक्कांच्या घरासाठी पोलीस पुत्रांच्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला लेखी पाठिंबा जाहीर करीत या लढ्याला बळ दिले आहे.
मुंबईच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या पोलिसांना बीडीडी चाळीतील घरांबाबत अनेक राजकीय पक्षांनी आजवर केवळ आश्वासनांचीच गाजरं दाखवली आहेत. पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून कुणीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या बीडीडी चाळीतील घरांचा प्रश्न सुटावा म्हणून पोलीस परिवारानं पुढाकार घेऊन 'घरं नाही तर, मतं नाही' ही नवी चळवळ सुरू करून पावले उचलली आहेत. त्यानिमित्ताने आयोजित बैठकीत आज सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.
पोलिसांच्या हक्काच्या घरासाठी सुरू असलेला लढा यापुढेही सुरूच राहणार. पोलिस कुटुंबांच्या जोरावर अनेक राजकीय पक्ष मोठे झाले. अनेकांनी आपापल्या पोळ्या भाजल्या. पण आता एकाही राजकीय पक्षाला पोलीस परिवार मतांची भीक घालणार नाही. पुरे झालीत तुमची तोंडी आश्वासनं! आता हवाय लेखी पाठिंबा, असेही पोलीस परिवारातल्या तरूणांनी राजकीय पक्षांना ठणकावून सांगितले. पोलीस पुत्रांच्या या भावना कळताच मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी पोलीस परिवाराची भेट घेऊन त्यांना मनसेचा लेखी पाठिंबा जाहीर केला. मनसे प्रमुख राज ठाकरे नेहमीच पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. आझाद मैदान दंगलीच्या प्रसंगी पोलिसांवर झालेला हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणारा मनसे हा एकमेव राजकीय पक्ष होता. त्यामुळे पोलिसांच्या घराच्या लढ्यातही मनसे उतरणार असल्याचेही संतोष धुरी यांनी आश्वासन दिले.
पोलीस परिवाराच्या आजच्या बैठकीमुळे स्थानिक पातळीवरील राजकरण चांगलेच तापलेय. सर्व पोलीस परिवार एकत्र आलं तर काहीही करू शकतं. हेच राज्य सरकारला दाखवून देण्याची वेळ आता जवळ आलीय. आपण आजवर अनेक पक्षांचे झेंडे हाती घेतलेत. पण आता कुणाचाच झेंडा हाती नको. जो आपल्यासाठी लढणार तोच आपला. आताची लढाई ही पोलीस पुत्रांची लढाई आहे. पोलीस परिवाराची लढाई आहे. ही लढाई पोलीस परिवारच जिंकणार. कारण आता ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाची नाही तर पोलीस कुटुंबाची आहे. जोपर्यंत ही घरं नावावर होत नाहीत तोर्पंत ही लढाई अशीच सुरू राहणार. आता मनसेने लेखी पाठिंबा दिला आहे. उद्या परवा शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसही आपला लेखी पाठिंबा जाहीर करतील असा विश्वास आहे. पण आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही आहोत. आता पोलीस परिवारातील प्रत्येक घराघरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीली जातील, असेही पोलीस परिवारातील सदस्यांनी सांगितले आहे.