संचारबंदीत पोलीस भासवून नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न; अल्पवयीन मुलासह तिघांना बेड्या
राज्यात संचारबंदी दरम्यान बाहेर फिरणाऱ्या लोकांना पोलीस असल्याचे भासवत पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापैकी एकजण अल्पवयीन मुलगा आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर, राज्यात संचारबंदी असल्याने बाहेर फिरल्यास पोलीस लाठीचार्ज करताना दिसत आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत तिन भामट्यांनी स्वतःला पोलीस आहे, असे भासवून एकत्र बसलेल्या चारपाच लोकांना लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केलीय. तिघांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या तिघांवार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलीस पुढील तपास करत आहे.
गुरुवारी संध्याकाळी दहिसर येथील गणेश नगर झोपडपट्टीच्या ठिकाणी चारपाच लोक बाहेर उभे होते. अटक करण्यात आलेला आकाश मिस्त्री, अल्पवयीन मित्रासह अजून एक त्यांचा मित्र हे तिघे त्या ठिकाणी गेले. तुम्ही या ठिकाणी बसला आहात, देशात संचारबंदी आहे. तुम्ही एकत्र इथे बसून गुन्हा केला आहे, असे सांगून त्यांच्याजवळ पैशांची मागणी केली. अन्यथा आम्ही तुम्हा सगळ्यांना पोलीस स्टेशनला नेऊ असा धमकावू लागले. लोकांनी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही लोक कोण आहात? तेव्हा त्यांनी स्वतःला पोलीस म्हणून सांगितले. आम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात डिटेक्टशन स्टाफ आहोत, असे सांगितले. हे तिघेजण थ्रीफोर्थ आणि टीशर्टवर होते. लोकांनी विचारलं की तुमचा गणवेश कुठे आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही मुद्दामून या कपड्यात आहोत. जेणेकरून लोकांना कळू नये आम्ही पोलीस आहोत.
नागरिकांचे स्थलांतर थांबवा, जिथं आहेत तिथं थांबवून त्यांची व्यवस्था करा, राज्यपालांचे निर्देश
पैसे उकळण्यासाठी शक्कल या तिघांच्या बोलण्यावर लोकांना संशय आल्याने त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क साधून तिघांची चौकशी केली असता हे तिघे पोलीस नसल्याचं समोर आलं. हे पैसे उकळण्यासाठी आले होते, असे चित्र स्पष्ट झालं. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील चौकशी सध्या पोलीस करत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी लोकांनाही आवाहन केलं आहे की जर तुमच्याकडे असे कोणी आले तर प्रथम तुम्ही त्यांचं ओळखपत्र बघा आणि काही संशय आल्यास तुम्ही स्थानिक पोलीस ठाणे किंवा जवळपास असलेल्या पोलिसांशी संपर्क साधा. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आता 163 जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 5 जणांचा यात मृत्यू झालाय.
Lock down | वाहतुकीची साधनं बंद असल्याने नाशिकच्या तरुणांचा ठाणे मार्गे राजस्थानला पायी प्रवास