Elephanta Boat Accident : गेट वे इंडिया बोट अपघातातील दोन जण अद्याप बेपत्ता; सहा वर्षांचा जोहान आपल्या परिवारासोबत फिरायला गेला मात्र...
Elephanta Boat Accident : बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातातील काही प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापही शोधकार्य सुरू असल्याची माहिती आहे.
मुंबई: गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात स्पीड बोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे भीषण दुर्घटना झाली. काल (बुधवारी) साडे चारच्या दरम्यान नौदलाची स्पीडबोट प्रचंड वेगात येऊन आदळली आणि गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाला निघालेली 'नीलकमल' ही फेरीबोट प्रवाशांसह उलटली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे, सोबतच अनेक प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातातील काही प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापही शोधकार्य सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात पठाण कुटुंबातील एक लहान मुलगा अद्याप सापडला नसल्याची माहिती आहे.
गोव्याच्या मापसा येथील वास्तव्यास असलेल्या पठाण कुटुंबातील काल झालेल्या बोट दुर्घटनेत सखीना अशरफ पठाण यांचा मृत्यू झाला. या बोटीवर अशरफ पठाण सखीना पठाण त्यांची दोन मुल आणि मृत सखीना पठाण यांची बहीण सोनाली होते. या अपघातात अशरफ पठाण त्यांचे 10 महिन्याचे लहान मूल आणि मेव्हणी सोनाली बचावली. तर सखीना पठाण यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांचा 6 वर्षाचा जोहान पठाण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी पोलिस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, कुलाबा येथे निलकमल बोटला काल नेव्हीच्या बोटने धडक दिली. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन जणं बेपत्ता आहेत. नेव्हीच्या चालकावर आम्ही भरधाव वेगाने बोट चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. 13 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची ओळख पटलेली आहे. मुंबई पोलिस कोस्टल पेट्रोलिंग आणि इतर यंत्रणेच्या मदतीने शोध मोहिम अजूनही सुरू आहे. अद्याप दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. हसंराज सतराजी भाटी (43 वर्ष), जोहान निसार अहमद (6 वर्ष) हे दोघे अद्याप बेपत्ता आहेत.
कुलाबा अपघात प्रकरणी 9 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. या अपघातात तीन परदेशी नागरिक ही होते. दोन जर्मनी आणि एक कॅनडाचा नागरिक होता. नेव्हीच्या बोटवरील 6 जणं होती. यातील 4 नेव्हीच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. दोन नेव्हीच्या अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत, नेव्हीची बोट त्या ठिकाणी ट्रायल ड्राइव्ह घेत असताना हा अपघात झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला इंडियन नेव्हीच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला आणि नंतर तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. या जोरदार धडकेत नीलकमल बोट बुडाली. अपघातावेळी बोटीमध्ये शंभरच्या वर प्रवासी आणि 5 बोटीचे सदस्य होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय. दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला हा अपघात घडला.