Bhiwandi : भिवंडीतील उच्चभ्रू 'टाटा आमंत्रा' इमारत पाण्यात, वीज, पाणी, लिफ्ट बंद असल्यानं रहिवाशी हवालदिल
भिवंडीत मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. भिवंडीतील उच्चभ्रू टाटा आमंत्रा हाऊसिंग काॅम्पलेक्समधील तळमजल्यावरील पार्किंगमध्ये पाणी शिरलं आहे.

भिवंडी: भिवंडीत मुसळधार (Bhiwandi Rain Update) पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. भिवंडी कल्याण बायपास रस्त्यावरील राजनोली नाका येथे नवे ठाणे म्हणून जाहिरातबाजी करुन टाटा हाऊसिंग कंपनीतर्फे उभारण्यात आलेल्या 24 ते 32 मजली आमंत्रा या उच्चभ्रू हाऊसिंग काॅम्पलेक्स मधील तळमजल्यावरील पार्किंगमध्ये पाणी शिरलं आहे. यामुळं वाहनांचे नुकसान तर झालेच परंतु तेथील विद्युत पुरवठा करणारे मीटर सुध्दा पाण्यात गेले आहेत. यामुळं या निवासी संकुलाच्या वीज पुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून बंद झाला आहे. तो अजून पर्यंत सुरूच होऊ शकला नाही.
या हाय प्रोफाईल सोसायटीच्या 12 इमारतीमध्ये तब्बल 1660 फ्लॅट्स असून या इमारतीमधील विद्युत पुरवठा व पिण्याचे पाणी पुरवठा बंद झाला आहे. तसंच या इमारतीमध्ये लिफ्ट देखील बंद झाल्याने या टोलेजंग इमारती मधील वृध्द, महिला, लहान मुले आज देखील आपल्या घरात अडकून पडल्याने इमारती खाली उतरू शकले नाहीत.
विद्युत पुरवठा बंद असल्याने लिफ्ट सुविधा कुचकामी ठरली असून त्यामुळे आजारी रुग्ण, महिला, वृद्ध, लहान मुले ही दहाव्या मजल्या पासून वरील मजल्यांवर अडकून राहिले आहेत. अशा बिकट प्रसंगी येथील कुटुंबियांसाठी व्यवस्थापनाकडून कोणतीही मदत केली जात नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत 20 लिटर पिण्याच्या पाण्याचे जार खरेदी करावे लागत आहेत. परंतु ते वर घरापर्यंत पोहचविण्यासाठी 100 ते 150 रुपये खर्च करावे लागत आहेत.
2019 मध्ये सुध्दा अशी परिस्थिती याठिकाणी उद्भवली होती मात्र त्यापासून कोणताही धडा व्यवस्थापनाने घेतला नाही. घरात वडीलधारे व्यक्ती, महिला, लहान मुले असल्याने कुटुंबियांच्या जेवणाची, दुधाची सोय करणे महत्वाचे आहे. या संकटामुळे आणि इथं असलेल्या समस्यांमुळं अनेक कुटुंबे येथून निघून गेली असून ज्यांच्याकडे दुसरा पर्याय होता त्यांनी ते ठिकाण गाठले. परंतु मध्यमवर्गीय कुटुंबियांना येथेच संकटाचा सामना करत राहावे लागत असल्याची खंत इथं राहणाऱ्या नागरिकांनी बोलून दाखविली आहे.





















