Kalyan Police : कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश
Kalyan Police Action On Smugglers : कल्याणमधून सुरू झालेला तपास हा आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनमच्या जंगलापर्यंत पोहोचला. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना बेड्या घातल्या आहेत.

ठाणे : कल्याण परिमंडळ 3 (Kalyan Police) च्या पथकाने तब्बल 1800 किमी प्रवास करून आंतरराज्य गांजा तस्कर रॅकेट (Ganja Smuggling Racket) उद्ध्वस्त केले. या ऑपरेशन पोलिसांनी तब्बल 22 दिवस जंगलात मोहीम राबवत 13 तस्करांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून 115 किलो गांजा (Marijuana) जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे 70 लाख रुपये इतकी आहे.
धक्कादायक म्हणजे, मोबाईल नेटवर्क नसलेल्या जंगलात ही टोळी वॉकी-टॉकी (Walkie Talkie) चा वापर करून तस्करी करत होती. पोलिसांनी आरोपींकडून 1 पिस्तूल, जिवंत काडतुसे, 2 वॉकी टॉकी, 2 कार, रिक्षा, बुलेट व इतर दुचाकी जप्त केल्या आहेत.
आंध्रप्रदेशच्या जंगलापर्यंत मोहीम
ही कारवाई कल्याण, पुणे, सोलापूर मार्गे थेट आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम (Visakhapatnam) च्या जंगलात राबवण्यात आली. सुरुवातीला कल्याणमधील आंबिवली येथे 100 ग्रॅम गांज्यासह एका तरुणाला अटक झाली होती. त्यानंतर तपास वाढवत नेमका गांजा कुठून येतो? टोळीचा सूत्रधार कोण आहे? याचा शोध घेण्यात आला. अखेर हा तपास विशाखापट्टणमच्या जंगलात जाऊन थांबला आणि तिथून तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
टोळीचा धक्कादायक कारनामा
जंगलात मोबाईल नेटवर्क नसल्याने या टोळीने वॉकी टॉकीचा वापर सुरू केला होता. इतकेच नव्हे तर जंगलातून बाहेर पडणाऱ्या गाड्यांच्या मागे आणखी गाड्या ठेवून सतत लक्ष ठेवले जात होते. अशा पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून ही तस्करी सुरू होती.
पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई
या संपूर्ण कारवाईत अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, डीसीपी अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मारुती आंधळे आणि पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. 22 दिवस चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणी अटक केलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर महाराष्ट्राबरोबरच आंध्रप्रदेश व तेलंगणातही गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. कल्याण-डोंबिवली परिसरासह राज्यभरात वाढणारी गांजा तस्करी (Marijuana Smuggling in Maharashtra) रोखण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.























