एकनाथ शिंदेंनी घेतली दाऊदी बोहरा समुदायाच्या नेत्यांची भेट, रमजानच्या शुभेच्छा देत विविध प्रश्नांवर चर्चा
Eknath Shinde : दाऊदी बोहरा समुदयाचे नेते सय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुंबईचा विकास आणि सामाजिक सुधारणांवर चर्चा झाली.
मुंबई: रमजान या पवित्र महिन्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरूवारी संध्याकाळी दाऊदी बोहरा समाजाचे (Dawoodi Bohra Community) नेते सय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट घेतली. दक्षिण मुंबईतल्या मलबार हील येथील 'सैफी महल' या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांच्यात विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
सामजिक न्याय आणि सामाजिक सुधारणा, मुंबईचा विकास आणि मदरशांचे आधुनिकीकरण या विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या पाऊणे दोन वर्षात केलेल्या कामांचे सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांनी कौतुक केले आणि त्यांना आशीर्वाद दिला.
मुख्यमंत्र्यांनी सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांना सांगितले की, दाऊदी बोहरी समाज हा शांतताप्रिय आणि देशासाठी काम करणारा समाज आहे ही एक गर्वाची बाब आहे.
दाऊदी बोहरी हा शांतताप्रिय समाज
सक्रिय, शांततापूर्ण आणि कायद्याचे पालन करणारे नागरिक म्हणून मानवतेच्या भल्यासाठी समर्पित असलेला समाज म्हणून दाऊदी बोहरा समुदयाने आपली ओळख निर्माण केली आहे. दाऊदी बोहरा मुस्लिम समुदायाची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक आहे. या समुदायाचे नेतृत्व त्यांचे नेते सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन करत आहेत.
मुंबईच्या जडणघडणीत दाऊदी बोहरा समाजाचे योगदान आहे. विशेषत: दक्षिण मुंबईत दाऊदी बोहरा नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन जगभरातील त्यांच्या अनुयायांना देशासाठी एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी आणि शांती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात.
भारतात दाऊदी बोहरा समुदयाचे लोक प्रामुख्याने महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये वास्तव्यास आहेत. त्याशिवाय गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, चेन्नई, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात दाऊदी बोहरा समुदयाचे वास्तव्य आहेत.