ED Summons Sanjay Raut : संजय राऊतांना पुन्हा ईडी समन्स; आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश
ED Summons to Shiv Sena MP Sanjay Raut : संजय राऊतांना पुन्हा ईडीनं समन्स बजावलं असून आज चौकशीसाठी हजर राहण्याचे राऊतांना निर्देश
ED Summons to Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. आज चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं संजय राऊतांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अशातच शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. राज्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांना बजावलेली नोटीस महत्त्वाची मानली जाते. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, यापूर्वी ईडीनं संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीनं प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची 9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी ईडीकडून संजय राऊतांची चौकशी करण्यात आली होती. आज दुसऱ्यांदा ईडीकडून राऊतांची चौकशी केली जाणार आहे. संजय राऊत यांची 1 जुलै रोजी ईडीनं तब्बल 10 तास चौकशी केली होती. ईडीही केंद्राची तपासयंत्रणा असून आपण ईडीला पूर्ण सहकार्य केलं. त्यांच्या मनात काही शंका असतील तर आमच्या सारख्या लोकांनी त्या दूर केल्या पाहिजेत, असा खोचक टोला देखील संजय राऊत यांनी लगावला होता.
पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे. नेमका काय आहे हा घोटाळा, हे आपण जाणून घेऊयात...
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.
संजय राऊतांना ईडीनं का पाठवलं समन्स?
ईडीनं 1 फेब्रुवारी रोजी ECIR दाखल केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.
प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, प्रवीण राऊतांचं नाव PMC घोटाळ्यातही आलं होतं. ज्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं की, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. याप्रकरणी वर्षा आणि माधुरी यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.
सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी एका वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीनं अलिबागमध्ये भागीदारीमध्ये जमीन खरेदी केल्याचंही उघडकीस आलं आहे. त्यामुळेच संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं होतं. आता पुन्हा याच प्रकरणी संजय राऊतांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Patra Chawl Land Scam : पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना ईडी समन्स; काय आहे घोटाळा?