संजय राऊत यांना ईडीकडून पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस
ED summons Sanjay Raut again : जामीनावर बाहेर आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून नोटीस आली आहे.

ED summons Sanjay Raut again : जामीनावर बाहेर आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून नोटीस आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चौकशीसाठी हजर राहण्याचं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. विशेष पीएमएलए कोर्टातून संजय राऊत यांना जामीन देत असताना चौकशीसाठी व तपासासाठी सहकार्य करावे अशी अट ठेवण्यात आली होती.
तब्बल 100 दिवसानंतर शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना बुधुवारी (9 नोव्हेंबर 2022) कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. आता ईडीनं चौकशीसाठी संजय राऊत यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे. 18 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीकडून राऊतांना पाठवण्यात आली आहे. त्याशिवाय संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा, अशी याचिका ईडीनं कोर्टात केली आहे. संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याकरता ईडीच्यावतीने सुधारीत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातील याचिका घाईघाईनं तातडीच्या सुनावणीसाठी दाखल केल्यानं सुधारीत याचिका दाखल करण्यासाठी हायकोर्टानं ईडीला मंजूरी दिली होती. लवकरच संजय राऊत यांच्यावतीनंही याला कोर्टात उत्तर दिलं जाईल. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर 25 नोव्हेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या जामीनाविरोधात ईडीनं हायकोर्टात धाव घेतली आहे.
खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या सुधारित याचिकेतील प्रमुख मुद्दे -
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरण अत्यंत गंभीर असून संजय राऊत यांचा जामीन रद्द करून त्यांना पुन्हा कारागृहात पाठवावं
या प्रकरणात झालेल्या पैश्यांच्या गैरव्यवहारांची लिंक अर्थात मनी ट्रेल आम्ही कोर्टात सिद्ध करूनही, कोर्टानं त्याचा विचार केला नाही, ईडीचा दावा
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं जामीनावर निकाल देताना, PMLA सेक्शन 45 मधील तरतुदी विचारात घेतल्या नाहीत
संजय राऊत यांचा या गुन्ह्यात जाणीवपूर्वक आणि सक्रिय सहभाग आहे
संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना, कोर्टानं ईडीवर ओढलेले ताशेरे, आदेशातून रद्द करावे आणि सुधारीत आदेश द्यावा
'2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री'
आमच्यावर खोटे आरोप आणि खोट्या कायदेशीर कारवाया होत राहतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 2024 पर्यंत आमची लढाई सुरुच राहील. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल. मी तुरुंगाबाहेर असो वा हे लोक पुन्हा मला तुरुंगात टाकू दे, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असंही राऊत म्हणाले.
आणखी वाचा :
Sanjay Raut : मी 103 दिवस तुरुंगात राहिलो, 103 आमदार निवडून आणणार; संजय राऊत कडाडले























