ईडीकडून DC Motors चे मालक दिलीप छाब्रिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल
Money Laundering Case Against Dilip Chhabria : डीसी मोटर्सचे मालक दिलीप छाब्रिया यांच्याविरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
Money Laundering Case Against Dilip Chhabria : डीसी मोटर्सचे (DC Motors) मालक दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) यांच्याविरोधात ईडीकडून (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundring Case) गुन्हा दाखल झाला आहे. यासंबंधी ईडीने नुकतेच मुंबई आणि पुण्यातील सुमारे सहा ठिकाणी छापेमारी केली. मुंबई पोलिसांच्या सीआययू युनिट आणि ईओडब्ल्यूने छाब्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांवर साल 2020 मध्ये नोंदवलेल्या खटल्यांच्या आधारे हा मनी लाँड्रिंगचा गुन्हा नव्याने दाखल करण्यात आला आहे.
दिलीप छाब्रिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने काही नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून कथित ग्राहक बनून कर्ज घेतल्याचं आढळून आल्याने मुंबई पोलिसांनी 28 डिसेंबर 2020 रोजी दिलीप छाब्रिया यांना अटक केली होती. दिलीप छाब्रिया यांच्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. यापैकी दोन सीआययूनं तर एक मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे.
काय आहे प्रकरण?
छाब्रिया यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोप केला आहे की छाब्रिया यांनी काही नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशनच्या अधिकार्यांशी संगनमत करुन त्यांच्या कंपनीकडून कार खरेदी केलेल्या ग्राहकांच्या नावांचा बेकायदेशीरपणे वापर करुन कोट्यावधींचं रुपयांचं कर्ज घेतलं. हे कर्ज फेडण्यात छाब्रिया अयशस्वी ठरले, त्यामुळे त्यांचा मुलगा, बहीण आणि एनबीएफसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील या प्रकरणात आरोपी करण्यात आलं आहे.
बीएमडब्ल्यू फायनान्सच्या अधिकार्यांची चौकशी
दिलीप छाब्रिया यांच्याकडील 41 कार पैकी 25 कारचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं नव्हतं. मात्र बीएमडब्ल्यू फायनान्स कंपनीने या 41 गाड्यांना तब्बल 58 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिल्याचा मुंबई पोलिसांचा आरोप आहे. आतापर्यंत पोलिसांकडून या प्रकरणी फायनान्स कंपनीच्या चार अधिकाऱ्यांची चौकशी झालेली आहे, यामधील एक आरोपी फरार आहे. दोन बीएमडब्ल्यू फायनान्स अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स पाठवलेले आहे. तर बीएमडब्ल्यूच्या दोन जर्मन नागरिकांना देखील मुंबई पोलिसांकडून यापूर्वीच समन्स पाठवण्यात आलेले आहे. हे दोन्ही जर्मन नागरिक बीएमडब्ल्यू फायनान्सशी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे.