ईडी, सीबीआय, एनसीबीचे बाहेरचे अधिकारी येऊन मराठी लोकांना त्रास देतात : संजय राऊत
Sanjay Raut on Mumabai Cruise Drug Case : एनसीबी प्रकरणी क्रांती रेडकर यांचा काय संबंध? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Sanjay Raut on Mumabai Cruise Drug Case : गेल्या बराच काळापासून मुंबई क्रूझ ड्रग प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. कालच त्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर याप्रकरणाला काहीसं वेगळं वळण लागलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. त्यावरुन सध्या वादंग उठला आहे. तसेच, त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याप्रकरणाबाबत संवाद साधला.
एनसीबी (NCB) प्रकरणी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांचा काय संबंध? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय बाहेरचे अधिकारी येऊन महाराष्ट्राला बदनाम करतायत, असा आरोपही आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकर यांचा काय संबंध? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरु आहे. क्रांती रेडकर यांच्यावर मला वाटत नाही कोणी व्यक्तीगत टीका केलीये, मी तरी पाहिलं नाही. नक्कीच आता महाराष्ट्रात ईडी, सीबीआय (CBI), एनसीबी (NCB) हे बाहेरचे अधिकारी येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत."
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ज्या प्रकारे दिल्लीतून आक्रमण सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा ज्यांच्या मानगुटीवर कारण नसताना बसण्याचा प्रयत्न होतोय, खोटे गुन्हे दाखल केले जातात, देगलूरमध्ये देखील धाडी पडल्यात अशोकराव मराठी नाहीत का?, पवार यांचे नातेवाईक मराठी नाहीत का? सगळेच मराठी आहेत. प्रश्न सत्य-असत्य लढायईचा आहे."
क्रांती रेडकर यांच्या विषयी आम्हाला प्रेम, ती मराठी मुलगी, तिच्यावर अन्याय होणार नाही : संजय राऊत
क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "क्रांती रेडकर यांच्या विषयी आम्हाला प्रेम आहे, ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. साहेब जरी नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. ठाकरे सरकार आहे, पवार साहेब आहेत. सगळं व्यवस्थित आहे. कोणावर अन्याय होणार नाही." तर समीर वानखेडे यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर विचारल्यानंतर संजय राऊत यांनी बोलणं टाळलं. ते म्हणाले की, "गुन्हा महाराष्ट्रात घडलाय. त्याविषयी मी फार बोलणार नाही, कारण तो सरकारचा विषय आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :