क्रांती रेडकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाल्या, मी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वाढलेली मुलगी, न्याय करा!
NCB अधिकारी समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्या पत्नी क्रांती रेडकर Kranti Redkar यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून न्याय करण्याची मागणी केली आहे.
Nawab Malik VS Sameer Wankhede : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आता NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून न्याय करण्याची मागणी केली आहे. एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती, असं क्रांती यांनी पत्रात म्हटलं आहे.
रेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे की, माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये हे त्या दोघांनी शिकवलं. तोच धडा घेऊन मी आज एकटीनं माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरुद्ध उभी आहे. लढते आहे. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
माननीय उद्धव ठाकरे साहेब @CMOMaharashtra पत्रास करण की … pic.twitter.com/0VJxURk5oi
— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) October 28, 2021
हे ही वाचा- मी सादर केलेले पुरावे खोटे ठरले तर राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईन : नवाब मलिक
क्रांती यांनी पत्रात म्हटलं आहे की, मी एक कलाकार आहे. राजनीती मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रुची लख्तरं चारचौघात उधळली जात आहेत. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करुन ठेवला आहे. विनोद करुन ठेवला आहे.
क्रांती यांनी पत्रात म्हटलं आहे की, आज बाळासाहेब असते तर त्यांना नक्कीच हे पटलं नसतं. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणाचं किती नीच स्वरुप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाहीत पण तुम्ही आहात. त्यांची सावली, त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती, असं क्रांती यांनी पत्रात म्हटलं आहे.
क्रांती यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, हा लढा एका आईचा, पत्नीचा, बहिणीचा लढा आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी मिलिंद नार्वेकर यांच्याकडे वेळ मागितली आहे. माझ्या कुटुंबाला बदनाम केलं जात आहे, असंही क्रांती यांनी म्हटलं.