(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Parab : अनिल परब ईडीच्या कार्यालयात येण्याची शक्यता कमी, वकिलांना पाठवून देणार
ED action on Anil Parab : अनिल परब त्यांचे वकील किंवा पदाधिकारी इडीच्या कार्यालयात पाठवणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : अनिल परब आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वत: हजर न राहता त्यांचे वकील किंवा पदाधिकाऱ्यांना ईडीच्या कार्यालयात पाठवणार असल्याची माहिती आहे. दापोलीच्या साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने राज्याचे मंत्री अनिल परब यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे.
सूत्रांनी सांगितले की अनिल परब त्यांचे वकील किंवा पदाधिकारी ईडीच्या कार्यालयात पाठवू शकतात. या आधीही अनिल परब कधीच प्रथमदर्शनी आले नाहीत. मागच्या वेळीही ते तिसऱ्या नोटीसनंतर ईडीच्या कार्यालयात आले होते. यापूर्वी ईडीने परब यांचे सहकारी सदानंद कदम आणि संजय कदम यांचे जबाब नोंदवले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले होते.
अनिल परब मात्र साईंच्या दरबारी
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, अनिल परब यांनी शिर्डीत साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली. अनिल परब हे साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित राहणार आहेत. अनिल परब यांचा दौरा हा पूर्वनियोजित होता. आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आज ते ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती.
शिवसेना लक्ष्य?
केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेनेचे काही मातब्बर नेतेही केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा चंग भाजपने बांधला असताना दुसरीकडे शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे. अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.
ते रिसॉर्ट माझं नाही; अनिल परब यांचा दावा
काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यावेळी साई रिसॉर्टबद्दल अनिल परब यांची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या छापेमारीनंतर अनिल परब माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर आणि माझ्याशी संबंधित छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. दापोलीचे साई रिसॉर्ट हे सदानंद कदम आहेत, तसा दावा त्यांनी कोर्टात केला आहे, तसे सर्व कागदपत्रे ही त्यांनी जमा केली आहेत. हे रिसॉर्ट अजून सुरू झालं नाही. तरीही या रिसॉर्टमधून पाणी हे समुद्रात जात असल्याचा आरोप करत केंद्रीय पर्यावरण खात्याने तक्रार केली. त्याच तक्रारीवरुन ईडीची आजची कारवाई आहे. हे रिसॉर्ट सुरूच नाही तर कारवाई कशी केली जाते हा प्रश्न आहे."