(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Court: पत्नीला पोटगी आणि तीन श्वानांच्या देखभालीचा खर्च द्या; मुंबईतील कोर्टाचे पतीला आदेश
Mumbai Court News: कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पत्नीसह तिच्या तीन श्वानांनाही पोटगी देण्याचा आदेश पतीला देण्यात आला आहे. या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
Mumbai Court: कोर्टाचे काही निर्णय लोकांच्या चर्चेचे विषय ठरतात. मुंबईतील एका न्यायालयाने दिलल्या एका निर्णयाची अशीच चर्चा सुरू झाली आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पत्नीसह तिच्या तीन श्वानांनाही पोटगी देण्याचा आदेश पतीला देण्यात आला आहे. एका 55 वर्षीय घटस्फोटित महिलेने न्यायालयाकडे रॉटवेलर्स जातीच्या तीन श्वानांच्या देखभालीचा खर्च पतीने द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिलाय.
मु्ंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे कोमलसिंग राजपूत याबाबतचा निर्णय दिला आहे. पत्नीच्या पोटगीत कपात करण्यात यावी, यासाठी युक्तिवाद पतीच्या बाजूने करण्यात आला. परंतु, कोर्टाने हा युक्तिवाद नाकारला. पत्नीच्या पोटगीत तीन श्वानांच्या देखभालीच्या खर्चाचा समावेश आहे. पाळीव प्राणीदेखील . सुसंस्कृत जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत आणि माणसाला निरोगी जीवन जगण्यासाठी ते आवश्यक आहेत, असे कोर्टाने म्हटले.
पाळीव प्राणी माणसाचं भावनिक आरोग्य जपतात, अशी टिप्पणी करत प्रतिमहिना 50 हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देण्याचाही आदेश कोर्टाने दिला.
कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत दरमहा 70,000 रुपये भरण्याची मागणी केली होती. परंतु तिच्या पतीने तिला तिच्या 3 पाळीव कुत्र्यांसाठीही देखभाल खर्च देण्यास नकार दिला होता. पतीच्या या नकाराविरोधात पत्नीने कोर्टात आव्हान दिले होते. मात्र, कोर्टाने पत्नीला अंशत: दिलासा दिला आहे. महिलेने दाखल केलेली मुख्य याचिका निकाली निघेपर्यंत पतीला दरमहा 50,000 रुपये खर्च देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
या जोडप्याचे लग्न 1986 मध्ये भारतातील एका शहरात झाले होते. त्यांना दोन मुली असून त्या परदेशात स्थायिक आहेत. परंतु 2021 मध्ये पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी पत्नीला देखभाल आणि इतर सुविधांचे आश्वासन देऊन मुंबईला पाठवले. मात्र, पतीने दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप पत्नीने केला. आपल्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नसून प्रकृती बरी नसून तीन श्वानांच्या देखभालीचा खर्च उचलणे कठीण असल्याचे पत्नीने कोर्टात आपली बाजू मांडताना म्हटले.
न्यायालयाने आणखी काय म्हटले?
- न्यायालयाने म्हटले आहे की, पाळीव प्राणीदेखील सुसंस्कृत जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत आणि माणसाला निरोगी जीवन जगण्यासाठी ते आवश्यक आहेत.
- याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, तुटलेल्या नात्यांमुळे निर्माण होणारी भावनिक पोकळी श्वान भरून काढतात.
- पाळीव प्राणी भावनिक आरोग्य आणतात. त्यामुळे महिलेला दरमहा 50 हजार निर्वाह भत्ता देण्यात यावा.
- व्यवसायात पतीचे नुकसान झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही, त्यामुळे तो आपली जबाबदारी टाळू शकत नाही.