Lalbaugcha Raja 2022 : लालबागच्या राजाच्या दरबारात बाचाबाची; भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वादावादी
Lalbaugcha Raja 2022 : लालबागच्या राजासमोर बाचाबाची. भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वादावादी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Lalbaugcha Raja 2022 : मुंबईत (Mumbai) गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पण लालबागच्या राजासमोर (Lalbaugcha Raja 2022) भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाल्यानं या उत्साहाला गालबोट लागलं आहे. मुखदर्शनाच्या रांगेतून जाताना हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या मंडपात बाचाबाची, राडा, अरेरावी, धक्काबुक्की, दमदाटी असे प्रकार काही नवे नाहीत. यापूर्वीही अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहे. कधी पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमधील राडे, कधी पोलिसांनी पत्रकारांसोबत केलेली अरेरावी, तर कधी महिलांना करण्यात आलेली धक्काबुक्की. आज गणेश चतुर्थी म्हणजे, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काही काळासाठी राजाच्या दरबारात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद निवळला.
लालबागचा (Lalbaug) गणेशोत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. त्यामुळे लालबागमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. यापूर्वीही अनेकदा मंडळातील कार्यकर्त्यांची अरेरावी, पोलिसांची दमदाटी, धक्काबुक्की, ढकलाढकली यांसारख्या घटना लालबागच्या राज्याच्या दरबारात घडल्याचंही पाहायला मिळालं आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अशातच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. यावेळी मुखदर्शनाच्या रांगेतून जाताना वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
लालबाग राजाच्या दर्शानासठी दोन वर्षांनंतर अलोट गर्दी बघायला मिळत आहे याचपार्श्वभूमीवर मुंबई पोलीस, पालिका कर्मचारी आणि मंडळाच्या सदस्यांकडून गर्दीचं नियोजन केलं जात आहे.
दरम्यान, गणेशोत्सवात अवघ्या देशाच्या नजरा जिथं असतात त्या लालबागमध्ये यावर्षी गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात प्रसिद्ध असलेला लालबागचा राजाच्या मंडळानं दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं नियोजन केलं आहे. लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळानं राममंदिराचा देखावा उभारला आहे.
पाहा व्हिडीओ : लालबागच्या राजाच्या दरबारी भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद