CIPLA Online Fraud : सावधान... CIPLAचे डिस्ट्रिब्युटर असल्याचे सांगत औषधांबाबत ऑनलाईन फसवणूक
कोरोनावर उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरसह अन्य औषधांचा तुटवडा सुरु असताना आवश्यकता असलेल्या व्यक्तिंना सिप्ला फार्मा कंपनीचे डिस्ट्रिब्युटर असल्याचे सांगत फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. अशात मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार देखील वाढत चालला आहे. कोरोनावर उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरसह अन्य औषधांचा तुटवडा सुरु असताना आवश्यकता असलेल्या व्यक्तिंना सिप्ला फार्मा कंपनीचे डिस्ट्रिब्युटर असल्याचे सांगत फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात सायबर सेलकडून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाचे आकडे वाढत असताना Remdesivir आणि Tocilisumab अशा औषधांची आवश्यकता भासत आहे. या औषधांचा तुटवडा असल्याने ही औषधं उपलब्ध करुन देण्यासाठी CIPLA PHARMA COMPANY सारख्या नामांकित कंपन्यांच्या नावाचा आधार घेवून इच्छुकांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडून काही इसम फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
याबाबत सायबर पोलिस ठाणे येथे सिप्ला फार्मा कंपनीकडून तक्रार प्राप्त झाली आहे की, सोशल मीडियावर अज्ञात इसम सिप्लाचे डिस्ट्रीब्युटर असल्याचे सांगून आवश्यकता असलेल्या व्यक्तिंना पैसे भरण्यास सांगून फसवणूक करत आहेत.
सायबर सेलने नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर नामांकीत कंपन्यांचा वापर करुन संबंधित कंपन्यांमध्ये कामावर असल्याचे सांगत औषधं देतो अशा जाहिरातींकडे दुर्लक्ष करावे. कुणीही जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करु नये. जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या नंबरवर संपर्क करु नये तसेच देण्यात आलेल्या अकाऊंटवर पैसे पाठवू नयेत.
आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कोणत्याही कंपनीला अथवा तिथं काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना रेमडेसिवीर अथवा इतर औषधं जनतेस परस्पर उपलब्ध करुन देता येणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळं कुणीही सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या Remdesivir आणि Tocilisumab औषध उपलब्ध करुन मिळणार असलेल्या जाहिरातींना बळी पडू नका. असे प्रकार निदर्शनास आल्यास जवळच्या पोलिस स्टेशन अथवा सायबर सेलकडे तक्रार करावी, असे सायबर सेलने सांगितले आहे.
























