(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून : फडणवीस
आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून घेतल्याचा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुंबई : कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले आहे. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा केली. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.
कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला. पण त्यावर उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली, तर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले, तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले. ही रक्कम 2015 मध्ये सुमारे 2400 कोटी रुपयांच्या आसपास होती.
आज त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय? प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले तर विलंबाला जबाबदार कोण? शिवाय कांजूरमार्गची जागा ‘Marshy land‘ असल्याने त्याला स्थिर करण्यासाठी किमान 2 वर्षांचा अवधी लागेल. याशिवाय आतापर्यंतच्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील आणि नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल. या नवीन जागेसाठी डीपीआर किंवा फिजीबिलीटी अहवाल काहीही तयार झालेले नाही. म्हणजे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे.
आरेचं जंगल आता 800 एकरांचं तर मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार, मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा
आरेच्या कारशेडसाठी 400 कोटी आधीच खर्च झालेले आहेत. स्थगितीमुळे 1300 कोटी पाण्यात गेले. शिवाय 4000 कोटींचा वाढीव भार. कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार. आज त्यात आणखी किती वाढ होणार? एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? जनतेची किती मोठी दिशाभूल आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार : मुख्यमंत्री
मागील काही दिवसांपूर्वी आरेतील जागा जंगल घोषित केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, आरेतील जागा जंगल घोषित केली आहे. त्यावेळी 600 एकर जागेची घोषणा केली होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून 800 एकरची व्याप्ती करण्यात आली आहे. आता मुंबईत 800 एकराचं जंगल असणार आहे. आहे ते टिकवणं आपलं काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
Uddhav Thackeray Speech | आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण