(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis Office Attack: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव उघड करण्यास नकार, 'त्या' पोलिसांचीही चौकशी होणार?
Unknown woman attack on Devendra Fadnavis office: या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यालयाची तोडफोड का केली, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मंत्रालयात तगडी सुरक्षाव्यवस्था असतानाही ही महिला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयापर्यंत कशी पोहोचली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करताना तिकडे महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हती. त्यामुळे तोडफोड केल्यानंतर ही महिला पुरुष पोलिसांच्या देखत मंत्रालयातून सहजपणे निसटली होती. या प्रकारामुळे मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्थेतबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होण्यासोबतच एकप्रकारे पोलिसांचीही नाचक्की झाली होती. मात्र, आता पोलिसांनी या महिलेची ओळख पटवण्यात यश मिळवले आहे. परंतु, पोलिसांनी या महिलेचे नाव उघड करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या या महिलेचे नाव गुलदस्त्यात का ठेवले जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. ही महिला पर्स आतमध्ये राहिल्याचे कारण सांगून सचिवालय गेटने पुन्हा गेटपास न घेता आतमध्ये शिरली. त्यानंतर ही महिला सहाव्या मजल्यावरील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापाशी पोहोचली. यानंतर या महिलेने घोषणा देत फडणवीसांच्या कार्यालयावरील नेमप्लेट काढून फेकली. याठिकाणी लावण्यात आलेल्या शोभेच्या झाडांच्या कुंड्याही या महिलेने फेकून दिल्या. त्यानंतर ही महिला पोलिसांदेखत मंत्रालयातून निसटली. त्यानंतर पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला. अखेर 18 तासांनी पोलिसांना या महिलेची ओळख पटवण्यात यश आले आहे. मात्र, तुर्तास पोलिसांनी या महिलेची ओळख उघड करण्यास नकार दिला आहे.
मात्र, या घटनेमुळे राज्यातील महत्त्वाचे प्रशासकीय ठिकाण असलेल्या मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेतबाबत शंका निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय हे हाय सिक्युरटी झोनमध्ये येते. याठिकाणी पास न घेता मंत्रालयात शिरलेली महिला कशी पोहोचू शकते, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलीस काय करत होते, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ही घटना घडली त्यावेळी या परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे समजते.
मंत्रालयातील ६ व्या माळ्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 27, 2024
याच कार्यालयाबाहेर एक महिला गृहमंत्र्यांच्या नावाची पाटी तोडून आपला राग व्यक्त करतांना व्हिडीओत दिसत आहे.
एकीकडे सरकारचे लाडक्या बहिणीचे इव्हेंट सुरू आहेत तर दुसरीकडे एक महिला मंत्रालयात येऊन संतापाने… pic.twitter.com/XcOpjwRyME
महिलेवर गु्न्हा दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या या महिलेवर ट्रेस पासिंग आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या महिलेला आता पोलीस कधी अटक करणार, हे पाहावे लागेल. या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड का केली, याबाबतही आता खरी माहिती समोर येईल.
आणखी वाचा
मोठी बातमी: देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड