उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्ड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्ड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. "आपली प्रकृती उत्तम असून विश्रांतीनंतर लवकरच आपल्यासोबत असेन," असं अजित पवारांनी म्हटलं आहे. थकवा जाणवत असल्याने अजित पवार गेल्या चार दिवसांपासून होम क्वॉरन्टाईंन होते. यानंतर आज सकाळी ते ब्रीच कॅण्ड रुग्णालयात दाखल झाले.
"माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, असं अजित पवार यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल
अजित पवारांची प्रकृती नॉर्मल, विश्रांतासाठी रुग्णालयात : राजेश टोपे "अजित पवार यांना खोकला होता, त्यामुळे कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती नॉर्मल आहे, फक्त विश्रांतीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पाच-सात दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल," अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसंच त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांची चाचणी केली असून ते सर्व जण निगेटिव्ह आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार मागील आठवड्यात पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. तरीही त्यांनी शनिवारी (17 ऑक्टोबर) बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपून परतल्यानंतर त्यांना तापही आला होता. त्यामुळे कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आली असली तरी थकवा असल्याने त्यांनी घरीच राहून आराम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
संबंधित बातम्या
अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खोटी, पार्थ पवारांकडून वृत्ताचं खंडन
अजित पवार होम क्वॉरन्टाईन, मात्र व्हिसीद्वारे बैठकीला हजर राहणार!