(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे? आज महत्त्वाची बैठक, शिवाजी पार्कसह इतर जागांची चाचपणी सुरु
Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्याबाबत एकनाथ शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक, शिवाजी पार्कचं मैदान न मिळाल्यास इतर जागांची चाचपणी करणार, तूर्तास बीकेसी मैदानाचा पर्याय
Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यावरुन शिंदे गट (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गट (Uddhav Thackeray) यांच्या सुरु झालेल्या राजकीय नाट्याचा शेवटचा अंक जवळ आला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटानं आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही तर दुसरा कोणता पर्याय असू शकतो, याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान काल (सोमवारी) शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला. त्यामुळे शिवाजी पार्कवर परवानगी नाही मिळाली तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होणार का? हे पहावं लागेल. दरम्यान मुंबई महापालिकेनं दोन्ही गटाच्या अर्जाची छाननी सुरु आहे. आणि आयुक्त कुणाच्या बाजूनं निर्णय देतात हे पहावं लागेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतल्या बंडखोर गटाचा दसरा मेळावा कुठे आणि कसा घ्यायचा याविषयी निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत (Mumbai) बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) प्रतिष्ठानसमोरील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वास्तूत ही बैठक आज संध्याकाळी सात वाजता होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीला सर्व मंत्री, आमदार, नेते, उपनेते आणि युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत दसरा मेळाव्याला जर शिवाजी पार्कची जागा मिळाली नाही तर इतर जागेवर दसरा मेळावा घेण्यावरही चर्चा होणार आहे. शिंदे गटाकडून शिवाजी पार्क आणि बीकेसीतल्या जागेसाठी अर्ज करण्यात आला आहे.
भगवान गडावर दसरा मेळावा घेणार : करुणा शर्मा
दसरा मेळाव्याच्या राजकारणात आता करुणा शर्मांनी उडी घेतली आहे. मी वंजारी समाजाची सून आहे, भगवानगडावर दसरा मेळावा मी पुन्हा सुरु करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शिवाजी पार्कवर कुणाचा मेळावा? पालिकेकडून अर्जांची छाननी सुरु
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार? उद्धव ठाकरेंचा की शिंदे गटाचा? या संदर्भात मुंबई महाालिका लवकरच निर्णय घेणार आहे.. गणेशोत्सव संपल्याने मुंबई महापालिका आता दोन्ही बाजूच्या अर्जाची छाननी करणार आहे. या संदर्भातील अहवाल मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवला जाईल आणि त्यानंतर आयुक्त निर्णय जाहीर करतील. दरम्यान शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाही तर शिंदे गटानं बीकेसी अर्थात वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानाचा पर्याय ठेवलाय. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी तशी माहिती दिली आहे.