मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज
Dahi Handi Festival 2022 : दहीहंडी खेळताना मुंबईत 111 गोविंदा जखमी झाले, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी झालेत. 88 गोविंदांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. कोविडमुळे (Covid-19) गेल्या दोन वर्षांच दहीहंडीसोबतच इतरही अनेक उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. यंदा मात्र मोठ्या जल्लोषात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक गोविंदांनी मोठ्या राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. एकीकडे राज्यभरात मोठ्या उत्साहात सण साजरा झाला, तर दुसरीकडे दहीहंडी पथकांतील अनेक गोविंदा जखमीही झाले. काल (शुक्रवारी) दिवसभरात मुंबई आणि ठाणे मिळून एकूण 148 गोविंदा जखमी झाले आहेत.
मुंबईसह आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह दिसून आला. मात्र काही ठिकाणी गोविंदांचे अपघातही झाले. मुंबईत 111 गोविंदा जखमी झाले, तर यातील 88 जणांना उपाचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर दुसरीकडे ठाण्यात 37 गोविंदा जखमी झाले आहेत. तसेच 23 गोविंदांवर अजूनही उपचार सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही गोविंदाला मोठी दुखापत झालेली नाही. तर, अद्याप कुणीच मृत्यूमुखी पडलेलं नाही.
जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार : मुख्यमंत्री
दहीहंडी उत्सवा दरम्यान, कोणत्याही गोविंदाला दुखापत झाल्यास जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काल (शुक्रवारी) दहीहंडी असून कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर, राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना जखमी गोविदांवर मोफत उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या.
राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षीपासून दर वर्षासाठी लागू राहील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, काल (शुक्रवारी) मुंबई (Mumbai),पुणे (Pune), नाशिक (Nashik), नागपूरसह (Nagpur) देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर अनेक ठिकाणी यंदा उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली. मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी यंदा दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.