Cyclone Tauktae: तोक्ते चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रात मच्छीमारांची बोट अडकली; 15 जणांची सुखरुप सुटका
Cyclone Tauktae: तोक्ते चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रात मच्छीमारांची बोट अडकली होती. नौदलाच्या मदतीने बोटीवरील 15 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली.
मुंबई : तोत्के चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी घरांची छप्परं उडून गेली असून झाडे उन्मळून पडली आहे. बऱ्याच ठिकाणचा विजपुरवठा खंडीत झाला आहे. अशातच मुंबईपासून भर समुद्रात 175 किमी दूर मुंबई हाय फील्डवर 15 जण अडकले होते. नौदलाच्या जवानांनी यांची सुखरुप सुटका केली आहे.
भारतीय तटरक्षक दलाने गोवा कोस्ट येथून मिलाड नावाच्या फिशिंग बोटमधून 15 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका केली आहे. त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. सर्व कर्मचारी सुरक्षित असून सुरक्षेसाठी बोट किनाऱ्यावर आणली जात आहे.
रविवारी केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात तडाखा बसल्यानंतर आता तोक्ते चक्रीवादळ उत्तरेकडे गुजरातच्या दिशेने सरकत आहे. वाटेत महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही याचा परिणाम जाणवणार आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यायासह जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान समुद्रामध्ये उंच लाटा उसळल्या होत्या. चक्रीवादळामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळ तोक्ते येत्या 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत ते गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि महुवा दरम्यान किनाऱ्यावर येण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. गुजरातमधील सखल भागातील सुमारे सव्वा लाख लोकांना हलवण्यात आले आहे. तर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद बल (एसडीआरएफ) ची 54 पथके तैनात करण्यात आली आहेत.
हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की, चक्रीवादळ तोक्तेमुळे 17 मे रोजी मुंबईसह, उत्तर कोकण, ठाणे आणि पालघरच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड, उडुपी, चिकमगलूर आणि शिवमोगा जिल्ह्यात चक्रीवादळासंबंधीच्या घटनेमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.