तोक्ते चक्रीवादळात अडकलेल्या बार्ज P 305 जहाजावरील 26 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 65 बेपत्ता, बचावकार्य अजूनही सुरु
नौदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई किनाऱ्यावरील अरबी समुद्रात चक्रीवादळाच्या तडाख्यात बुडालेल्या बोर्ड हाऊसिंग बार्ज पी 305 जहाजावरील 26 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय.
मुंबई : तोक्ते चक्रीवादळामुळे आतापर्यंत मोठं नुकसान झाले आहे. अनेक राज्यांत या चक्रीवादळामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. अरबी समुद्रात बार्ज पी 305 जहाज बुडताना कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. यातील 125 जणांना घेऊन नौदलाची युद्धनौका आयएनएस कोची मुंबईला पोहोचली. सोबतच 26 मृतदेहही ताब्यात घेण्यात आले आहेत. बार्जवर एकूण 273 लोक उपस्थित होते, त्यापैकी नौदलाने आतापर्यंत 188 लोकांना वाचवले आहे.
डिफेन्स पीआरओ (मुंबई) च्या माध्यमातून ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये आयएनएस कोची आज सकाळी शहरातील बंदरात प्रवास करताना दिसत आहेत, ज्यात पी 305 बार्जवरील 188 लोकांना वाचविण्यात आले. आयएनएस कोलकाताही इतरांना वाचवून आज मुंबई बंदरात परतले आहे.
नौदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई किनाऱ्यावरील अरबी समुद्रात तोक्ते चक्रीवादळामुळे बुडालेले बोर्ड हाऊसिंग बार्ज पी 305 वर कमीतकमी 26 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 65 जण बेपत्ता आहेत. प्रतिकुल हवामानाचा सामना करणाऱ्या नौदलाच्या जवानांनी आतापर्यंत पी 305 जहाजात बसलेल्या 273 पैकी 188 लोकांची सुटका केली आहे.
अजूनही बचावकार्य सुरु असून बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. आम्ही अद्याप आशा सोडली नाही. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतसा कर्मचाऱ्यांची वाचण्याची शक्यता कमी होत आहे. आतापर्यंत 26 मृतदेह मुंबईत आणण्यात आले असल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली.
नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, इतर दोन बार्ज आणि ऑइल रिगवरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. विशेष म्हणजे तोक्ते चक्रीवादळ गुजरात किनाऱ्यावर आदळण्याच्या काही तास आधी मुंबईजवळील अरबी समुद्रात हे बार्ज अडकले होते. ओएनजीसी आणि एससीआयच्या जहाजाच्या माध्यमातून ते किनाऱ्यावर सुरक्षितपणे आणले जात आहेत. बचाव व मदत कार्यात मदत करण्यासाठी आयएनएस तलवारही या भागात तैनात आहे.