(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSMT News: सीएसएमटी स्थानकाचा होतोय पुनर्विकास, बदलणार चेहरामोहरा, कसे होणार बदल?
सीएसएमटी स्टेशनचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल सात कंपन्या पुढे आल्या आहेत. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र या पुनर्विकासात नेमकं काय करण्यात येणार आहे ते जाणून घेऊया या रिपोर्टमधून..
मुंबई : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असलेल्या सीएसएमटी स्टेशनचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल सात कंपन्या पुढे आल्या आहेत. येत्या काळात यापैकी एका कंपनीला कंत्राट देऊन सीएसटी स्थानकाच्या पुनर्विकास केला जाईल. तब्बल 133 वर्ष रेल्वे प्रवाशांच्या खातिरदारीसाठी सीएसएमटी स्थानक उभे आहे. मात्र जागतिक वारसा असलेल्या या स्थानकात आता प्रवासी संख्या वाढल्याने सोयी-सुविधांचा अभाव जाणवू लागलाय. जागा कमी पडू लागली आहे. त्याचबरोबर या वास्तूला जागतिक दर्जाचे बनवायचे असेल तर काही बदल करणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाला वाटत होते. म्हणूनच या वास्तूचा पुनर्विकास करण्याचे ठरवले गेले.
10 वर्ष चाललं होतं काम
सन 1878 साली ब्रिटिशांनी बोरीबंदर स्थानकाच्या आधी वास्तुविशारद सर फेड्रिक विल्यम स्टीवन्स यांच्या अखत्यारीत एका भव्य दिव्य स्थानकाची निर्मिती सुरू केली. दहा वर्ष या स्थानकाचे काम अहोरात्र सुरू होते. त्याकाळी तब्बल सोळा लाखाहून जास्त रुपये खर्चून भारतातले सर्वात मोठे स्थानक 1888 साली सुरू करण्यात आले. त्याचे नाव होते व्हिक्टोरिया टर्मिनस. हेच व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होय.
या ऐतिहासिक वारसा असलेल्या स्टेशनचा आता पुनर्विकास केला जातोय. या स्थानकाला मल्टी मॉडेल हब बनवण्यासाठी भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने प्रस्ताव तयार करून त्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर निविदा मागवल्या होत्या. या निविदांना कधी नव्हे तो सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे.
स्थानकाचा पुनर्विकास करणार म्हणजे नेमके काय करणार ?
- ज्या विकासकाला हे कंत्राट जाईल त्याकडे साठ वर्षांच्या भाडेतत्त्वावर हे स्थानक देणार,
- विमानतळाच्या धर्तीवर या स्थानकात सर्व सोयी-सुविधा दिल्या जाणार,
- या स्थानकाला मुंबईच्या मध्यवर्ती रेल मॉल प्रमाणे विकसित केले जाणार,
- 2.54 लाख चौरस मीटरचा जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणार,
- प्रवाशांसाठी साठी गॅलरी, बसण्याची जागा, कॅफेटेरिया, वाहन तळाची जागा निर्माण करण्यात येणार,
- लांब पल्ल्याच्या गाड्यांचं तिकीट केंद्र स्थलांतरीत करून इमारतीचा काही भाग पाडला जाणार,
- त्याऐवजी समोरील सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलरी उभारली जाणार
133 वर्षात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास
याशिवाय आपण सध्या पाहत असलेलं अॅनेक्स बिल्डिंग समोरील टॅक्सी स्टँड हटवण्यात येईल. याजागी मोकळी जागा निर्माण करून प्रवाशांना बसण्यासाठी आणि वावरण्यासाठी सुविधा निर्माण केली जाईल, मस्जिद बंदर स्थानकाच्या दिशेला लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फलाटाचं नूतनीकरण देखील करण्यात येणार आहे, मात्र या सुविधांच्या बदल्यात सेवाशुल्क देखील आकारण्यात येणार आहे.
ज्याप्रमाणे विमानतळाचा सार्वजनिक खासगी भागीदारीतून पुनर्विकास करून त्यावर सेवा शुल्क आकारले जाते. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात सीएसएमटी स्थानकात देखील सेवाशुल्क आकारले जाईल, याचा परिणाम म्हणून तिकिटांचे दर वाढवण्यात येतील.
या सेवाशुल्क वाढीमुळे प्रवासी संघटना नाराज आहेत. असे असले तरी गेल्या 133 वर्षात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास करण्यात येत आहे, ऐतिहासिक वारसा असलेल्या या स्थानकाला जर जागतिक दर्जाचे बनवले गेले तर नक्कीच पुरातन आणि आधुनिक सोयी-सुविधांचा संगम आपल्याला या स्थानकात दिसून येईल.