फटाका चॉकलेट्स अन् गोमय दिव्यांना बाजारात मागणी; मोठ्यांसोबत चिमुकलेही खुश
गाईचे दूध, गोमूत्र, तूप, दही आणि शेण या सर्वांचे एकत्रित मिश्रण करून म्हणजेच पंचगव्यापासून त्या बनविण्यात आल्या आहेत.
मुंबई : दिवाळीत दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आणि खाद्यपदार्थ विकण्यासाठी आणले जातात. ठाणे येथे यावर्षी दोन वेगळ्या प्रकारचे स्टॉल आम्हाला दिसले. कोपरी येथे सुरू असलेल्या स्वराज इंडिया बाजार मध्ये शेणाच्या पणत्या आणि फटाके चॉकलेट्स विकण्यास ठेवले गेले आहेत. या दोन्ही गोष्टींना ग्राहकांचा देखील भरपूर प्रतिसाद मिळत आहे.
शेणाच्या पणत्या या खऱ्या म्हणजे गोमय दिवे आहेत. गाईचे दूध, गोमूत्र, तूप, दही आणि शेण या सर्वांचे एकत्रित मिश्रण करून म्हणजेच पंचगव्यापासून त्या बनविण्यात आल्या आहेत. या पणत्या पर्यावरण पूरक असून त्या लावल्याने घरातील हवा शुद्ध होते. या पण त्यातून जो धूर निघतो तो 100% कार्बनविरहित असतो हे सिद्ध झाले आहे. यात दिवा लावल्यावर साधारणतः वीस मिनिटे यातील वात जळते आणि त्यानंतर संपूर्ण दिवा जळून त्याची राख होते. त्याची ही राख आपण झाडांच्या खतासाठी वापरू शकतो. अशाप्रकारे पूर्णतः पर्यावरणासाठी अनुकूल असलेले हे दिवे सध्या विकण्यास ठेवण्यात आले आहेत. या बारा दिव्याची किंमत दीडशे रुपये इतकी आहे.
तर फटाके चॉकलेट देखील या ठिकाणी विक्रीस ठेवण्यात आले आहेत. यावर्षी कमीतकमी फटाके फोडावे असे आवाहन करण्यात आल्यामुळे प्रदूषण करणारे फटाके फोडण्याच्य ऐवजी या चॉकलेटच्या फटाक्यांना ग्राहकांनी पसंती दिली आहे. ठाण्यातील रहिवासी तन्वी पांगारे यांची ही संकल्पना आहे. या फटाका चॉकलेटमध्ये ड्रायफ्रूटचा देखील वापर करण्यात आला आहे. यात डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, ड्रायफ्रूट डार्क चॉकलेट हे तीन फ्लेवर्स आहेत. रॉकेट, भुईचक्र, पाऊस, लक्ष्मी बॉम्ब, रश्शी बॉम्ब, लवंगी बार हे फटाक्यांचे विविध प्रकार तर कंदीलही फटाका चॉकलेटमध्ये पाहायला मिळत आहे. यात 150 रुपयांचा बॉक्स असून त्यात डार्क आणि मिल्क चॉकलेट, 250 रुपयांच्या बॉक्समध्ये ड्रायफ्रूट, डार्क आणि मिल्क चॉकलेट तर 350 रुपयांच्या बॉक्समध्ये ड्रायफ्रूट, डार्क आणि मिल्क चॉकलेटसह कंदील चॉकलेट तर हॅपी दिवाळीचा टॅगिंग लावलेले चॉकलेट यात पाहायला मिळत आहे. केवळ घरी खाण्यासाठीच नाहीतर कार्यालयांमध्ये गिफ्ट देण्यासाठी देखील या फटाका चॉकलेटचा उपयोग केला जात आहे.