Mumbai Corona Cases: मुंबईतील झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीकडे; धारावीत आज एकाही रुग्णाची नोंद नाही तर केवळ 11 सक्रीय रुग्ण
आशिया खंडातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये आज एकाही नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही तर केवळ 11 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी दाटवस्ती असलेली झोपडपट्टी धारावीची वाटचाल आता कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरु झालेली पाहायला मिळत आहे. धारावीमध्ये आज एकाही नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नसून सध्या फक्त कोरोनाचे 11 सक्रीय रुग्ण राहिले आहेत. एकीकडे मुंबईतल्या झोपडपट्ट्यांनी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांनी कोरोनामुक्तीच्या दिशेनं पाऊल टाकलंय. मात्र, मुंबईतील उच्चभ्रु वस्तीतील इमारतींमधली रुग्णसंख्या घटण्याचा वेग मात्र धीमा आहे.
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात येऊ लागलीय. मुंबईतल्या झोपडपट्टी विभागानं कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु केलीय. मात्र, उच्चभ्रु वस्तीची चिंता अद्याप कायम आहे.
मुंबईतील झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीकडे
सध्याच्या घडीला मुंबईत 83 इमारती सिल्ड आहेत तर केवळ 22 ठिकाणी झोपडपट्टी आणि चाळींमध्ये कंटेंटमेंट झोन राहिले आहेत. 24 पैकी 18 वॉर्डमध्ये एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. मुंबईतील सर्वाधिक धोका असलेल्या दाटीवाटीच्या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर दाटीवाटीने वसलेल्या आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीची चिंता वाढली होती. मात्र, आता दुसऱ्या लाटेतही धारावीनं रुग्णसंख्येचा शून्य आकडा गाठला.
Mumbai's Dharavi records zero cases of #COVID19 for the second day. Active cases stand at 11, as per the Municipal Corporation of Greater Mumbai
— ANI (@ANI) June 15, 2021
झोपडपट्टीतली रुग्णसंख्या घटण्यामागे कोणता मास्टर प्लान?
पालिकेने ‘मिशन झिरो’सह ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, औषधोपचार, सॅनिटायझेशनचे कार्यक्रम राबवले. जनजागृतीच्या माध्यमातून प्रभावी काम केल्यामुळे झोपडपट्टीतील कोरोना वेगाने नियंत्रणात आला आहे.
कुर्ला, वरळी कोळीवाडे, घाटकोपर, मुलुंड, अंधेरी, वांद्रे या ठिकाणी मुंबईतील दाटीवाटीची वस्ती आहे. संपूर्ण मुंबईतील झोपडपट्टी भागात वेगाने रुग्णसंख्या वाढली आणि हे भाग ‘कोरोनाचे हॉटस्पॉट’ म्हणून ओळखले गेले. या भागात निकट संपर्क टाळून कोरोना कसा रोखणार असे आव्हान पालिकेसमोर निर्माण झाले होते. मात्र दुसऱ्या लाटेतही इमारती आणि उच्चभ्रू वस्तींच्या तुलनेत झोपडपट्टीने कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवले.
झोपडपट्ट्यांच्या भागात कायस्थिती?
संपूर्ण झोपडपट्टीने कोरोनाकडे वाटचाल केली असून फक्त सहा वॉर्डमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके कंटेनमेंट झोन शिल्लक आहेत. यामध्ये अंधेरी पूर्वमध्ये 8 कंटेनमेंट झोन, कांदिवली 6, भांडूप 3, मुलुंड आणि चेंबूरमध्ये प्रत्येकी 2 आणि भायखळा प्रभागातील झोपडपट्ट्यांमध्ये केवळ एक कंटेनमेंट झोन शिल्लक आहे.
दाटीवाटीच्या भागात कोरोना आटोक्यात
कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये पालिकेसाठी आव्हान ठरलेल्या उत्तर मुंबईतील बोरिवली, दहिसर, गोरेगाव, मालाड, अंधेरी पश्चिम विभागातील झोपडपट्टय़ांमध्ये आता एकही कंटेनमेंट झोन नाही. याशिवाय कुलाबा, फोर्ट, डोंगरी, चिराबाजार, काळबादेवी, ग्रँटरोड, शीव-वडाळा, किंग सर्कल, परळ, एल्फिन्स्टन, धारावी, दादर, माहीम, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कुर्ला, घाटकोपर या वॉर्डमधील झोपडपट्यांमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही.