Covid Vaccination : परदेशात जाणाऱ्या प्रवाशांच्या बूस्टर डोसबाबत BMC ची नवी नियमावली, दिले 'हे' निर्देश
Covid Vaccination : परदेशात जाणाऱ्या प्रवाशां बूस्टच्यार डोसबाबत BMC ची नवी नियमावली. आता 9 महिन्यांनी नाहीतर केवळ तीनच महिन्यांत घेता येणार बूस्टर डोस
Covid Vaccination : मुंबईतून परदेशात जाणाऱ्या व्यक्ती आता 90 दिवसांनी बूस्टर डोस (Booster Dose) घेणार आहेत. BMC ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोविड लसींच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्यासाठी केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. बीएमसीनं त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व खाजगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांना याबाबत आदेश जारी केले आहेत. केंद्रानं शुक्रवारी (13 मे) सांगितलं होतं की, नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या उद्देशानं परदेशात जाणारे लोक कोविड-19 विरोधी लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर तीन महिन्यांनी कोणत्याही वेळी बूस्टर डोस घेऊ शकतात.
केंद्र सरकारनं कोरोना प्रतिबंधक लसींच्या बूस्टर डोससाठी नियम शिथिल करताना, परदेशात प्रवास करणाऱ्या लोकांना नऊ महिन्यांच्या कालावधीत कपात करत तीन महिन्यांतच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना देशाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार डोस घेण्याची परवानगी दिली आहे.
कोविड प्रतिबंधात्मक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रौढ व्यक्तिंना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी (39 आठवड्यांनी) बूस्टर डोस (Precuation Dose) देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास करणं गरजेचं असणाऱ्या व्यक्तिंना या कालावधीत सवलत देण्यात यावी, अशी मागणी होत होती. या अनुषंगानं संबंधित तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार, आता सदर बाबत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार ज्या व्यक्तिंना आंतरराष्ट्रीय प्रवास करणं गरजेचं आहे आणि ज्या देशात त्यांना जायचं आहे, त्या देशातील नियमांनुसार, बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे, अशा व्यक्तिंना आता दुसरा डोस घेतल्यानंतर किमान 90 दिवसांनी तिसरा डोस घेता येणार आहे, अशी माहिती एका विशेष पत्राद्वारे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कळविली असल्याचं अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितलं आहे.
वरील तपशिलानुसार, 'कोविन अॅप'मध्ये आणि संबंधित संगणकीय प्रणालीत आवश्यक ते बदल केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्तरावर करण्यात आले असल्याचंही सदर पत्राद्वारे कळविण्यात आलं आहे. त्याचबरोबर लशीची मात्रा देण्याबाबतच्या सर्व मार्गदर्शक सुचनांनुसार आणि वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक त्या बाबींची अंमलबजावणी सुयोग्यप्रकारे करणं आवश्यक असल्याचं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. तरी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक आणि खासगी लसीकरण केंद्रांनी याची नोंद घ्यावी. तसेच, त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आल्या आहेत.
आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि वय वर्ष 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना सदर सुविधा शासकीय आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर मिळेल. तसेच 18 वर्ष ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी लसीकरण केंद्रावर सदर सुविधा उपलब्ध असेल. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांनी प्रतिबंधात्मक मात्रा वेळच्यावेळी घेण्याचं आवाहनही महानगरपालिका प्रशासनाद्वारे यानिमित्तानं पुन्हा एकदा करण्यात येत आहे.