Coronavirus | परप्रांतीय कुटुंबाची महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता, किराणा दुकान गरिबांसाठी विनामूल्य खुलं
उत्तर प्रदेशातून आलेलं गुप्ता कुटुंबाने महाराष्ट्राने केलेल्या उपकाराची परतफेड करायचं ठरवलं आहे. आपल्या किराणा दुकानात येणाऱ्या वाटसरु तसंच गरीब, गरजूंना गुप्ता कुटुंब विनामूल्य धान्य वाटप करत आहे.
वसई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन झाला आहे. लॉकडाऊनमुळे देशभरातील मजुरांच्या, हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार गेला आणि खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले. परिणामी अनेकांनी गावाच्या दिशेने पायपीट सुरु केली. अशा परिस्थितीत वसईतील एक परप्रांतीय कुटुंब माणुसकी जपताना दिसत आहे. दुकानात येणाऱ्या गरिबांना ते विमामूल्य धान्यवाटप करत आहे. शिवाय वाटसरुंना पाण्याची बॉटल, खाऊ तसंच निवारा देत आहेत.
हरिश्चंद्र गुप्ता हे कुटुंबासह 1956 साली उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रातील वसई इथे आलं. त्यानतंर 1974 मध्ये कोल्ही चिचोंटी इथे त्यांनी छोट्याशा झोपडीत नारायण जनरल स्टोर्स हे किराणा मालाचं दुकान सुरु केलं. त्यावेळी आजूबाजूला कुणीही नव्हतं. काही आदिवासी कुटुंब होती, ती ही पाड्यात विखुरलेली. कालांतराने इथे मुंबई-अहमदाबाद महामार्ग तयार झाला.
ऊन-पाऊन असो वा वादळी-वारा हा महामार्ग कधीच थांबला नाही. हा महामार्ग मुंबई ते गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार असा दिल्लीला जोडतो. त्यामुळे हा माहामार्ग कधीच थांबला नाही. आज मात्र या कोरोनाने हायवे ओसाड केला आहे. उपासमारीमुळे बहुतेक लोक पायी चालत जाताना गुप्ता कुटुंबांला दिसत आहेत. गरीब आणि कष्टकरी हातावर कमावणाऱ्या लोकांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र उत्तर प्रदेशातून येऊन, महाराष्ट्राने केलेल्या उपकाराची परतफेड करायची उत्तम संधी असल्याचं ठरवून, गुप्ता कुटुंब हे दुकानावर येणाऱ्या वाटसरु तसंच गरीब, गरजूंना विनामूल्य धान्य वाटप करत आहे. त्यांना पाण्याची बॉटल, खाऊ देऊन, निवारा देत आहेत. धान्य वाटप करण्यासाठी त्यांनी आणखीही धान्य साठा मागवला आहे.
हरिश्चंद्र गुप्ता यांना पाच मुलं आहेत. सगळी सधन आहेत. मात्र आई-वडिलांच्या या उदात्त हेतूसाठी पुढाकार घेताना दिसून येत आहेत. संकटसमयीच खरा माणुसकीचा झरा आता दिसून येत आहे. गुप्ता हे परप्रांतीय आहेत मात्र आज त्यांची नाळ महाराष्ट्राशी जोडली आहे. महाराष्ट्राला काहीतरी देण्यासाठी आता गुप्ता कुटुंबीय तन मन धन अर्पण करुन कोरोनाशी सामना करत आहेत.