Coronavirus | मुंबई महापालिकेच्या कोरोना कॉल सेंटरला उत्स्फुर्त प्रतिसाद, दहा दिवसात 6 हजार नागरिकांना फायदा
कोरोनाची माहिती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी यासाठी मुंबई महापालिकेने कॉल सेंटरची सुविधा सुरु केली आहे. दूरध्वनी क्रमांक '020-470-85-0-85' यावर सकाळी 10 ते सायंकाळी 7 या कालावधीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन नागरिकांना मिळत आहे.
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना कोविड - 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ज्या व्यक्तींना कफ, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेताना त्रास होणे अशी लक्षणे जाणवत असतील; त्यांना दूरध्वनीद्वारे व घरबसल्या महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन प्राप्त करून घेता यावे, याकरिता 'कॉल सेंटर'ची सुविधा मुंबई महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत दूरध्वनी क्रमांक '020-470-85-0-85' यावर सकाळी 10 ते सायंकाळी 7 या कालावधीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन नागरिकांना दिलं जात आहे.
या प्रकारच्या देशातील या पहिल्याच कॉल सेंटरला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा दिवसात तब्बल 6 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी दूरध्वनी करून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले आहे. तर यापैकी 319 व्यक्तींना कोरोना कोविड 19 विषयक वैद्यकीय तपासणी करवून घेण्यासाठी रेफर करण्यात आले आहे. हे करताना संबंधितांना त्यांच्या घरी येऊन नमुने घेऊन जाणाऱ्या प्रयोगशाळांचे दूरध्वनी क्रमांक हे कॉल सेंटर द्वारे देण्यात येत आहेत. जेणेकरून संशयितांना त्यांची वैद्यकीय चाचणी करवून घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही.
महापालिकेच्या कॉल सेंटरला दूरध्वनी करून मार्गदर्शन घेणाऱ्या व्यक्तींपैकी 1 हजार 224 व्यक्तींना घरच्या घरीच विलगीकरण (Home Quarantine) करण्याच्या सूचना देण्यात आल्या. घरच्या घरी विलगीकरण करताना "काय काळजी घ्यावी, ते कसे करावे, किती दिवस पर्यंत करावे?" इत्यादी बाबतचे मार्गदर्शन व सूचना संबंधित व्यक्तीला दूरध्वनीद्वारेच देण्यात आल्या. तसेच आवश्यकतेनुसार सदर सूचना त्यांच्या घरातील व्यक्तींना देखील दूरध्वनीद्वारे देण्यात आल्या. जेणेकरून 'कोरोना कोविड 19' या आजारास अधिक प्रभावीपणे आळा घालता येईल.
घरून गोळा केलेल्या नमुन्यांपैकी 130 बाधित असल्याचे निष्पन्न
'कॉल सेंटर' द्वारे रेफर करण्यात आलेल्या व्यक्ती आणि याव्यतिरिक्त ज्यांच्या वैद्यकीय तपासण्यांसाठीचे नमुने खाजगी प्रयोगशाळांद्वारे घरच्या घरून गोळा करण्यात आले; त्यापैकी 130 व्यक्तींना 'कोविड कोरोना 19'ची बाधा झाली असल्याचे प्रयोगशाळेतील वैद्यकीय तपासणी अंती निष्पन्न झाले. या बाधा झालेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल करून आवश्यक ते औषधोपचार सुरू करण्यात आले. मुंबई महापालिकेने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे वैद्यकीय तपासण्यांसाठीचे नमुने घरून गोळा करण्यास खाजगी प्रयोगशाळांना परवानगी मिळाली. ज्यामुळे 130 बाधितांची निश्चिती होऊन त्यांच्यावर वेळीच औषधोपचार करणे शक्य होण्यासह त्यांच्या लगतच्या संपर्कातील व्यक्तींची निश्चिती करणे व त्यांचे विलगीकरण करणे सुलभ झाले
कॉल सेंटरद्वारे नियमित पाठपुरावा महापालिकेच्या या कॉल सेंटरच्या सुविधेमुळे 'कोरोना कोविड 19' ची लक्षणे वाटत असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मनातील शंकेचे निरसन सहजपणे व घरबसल्या करता येत आहे. या दूरध्वनी मार्गदर्शनादरम्यान दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांना आढळून आल्यास त्या व्यक्तीला त्याच्या परिसरातील खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतून 'कोरोना कोविड 19' ची चाचणी करवून घेण्याचे निर्देशित करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने कॉल करणाऱ्या सर्व नागरिकांची लक्षणे, दूरध्वनी क्रमांक, राहत असलेला परिसर इत्यादी बाबींची सुव्यवस्थित नोंद कॉल सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. यामुळे या 'कॉल सेंटर'ला ज्यांनी फोन केले आहेत, त्यांना 'कॉल सेंटर' द्वारे 'फोन' करण्यात येत असून त्याद्वारे आवश्यक तो पाठपुरावा देखील नियमितपणे करण्यात येत आहे. त्याचबरोबर घरच्याघरी विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींबाबत देखील 'कॉल सेंटर' द्वारे पाठपुरावा करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
- राज्यातही आमदारांच्या वेतनात एक वर्ष कपात; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
- coronavirus | शनिवारपासून नवी मुंबई एपीएमसी भाजी मार्केट बंद
- coronavirus | मांजर पाळताय, खबरदारी घ्या ! मांजरामुळे होऊ शकतो 'कोरोना'
- सोशल डिस्टन्सिंगचं चांगभलं! बँकांना तीन दिवस सुट्या, खातेदारांच्या रांगा