Coronavirus | नवी मुंबईत भाजपकडून 600 टन धान्याचं आणि 1 लाख 70 हजार मास्कचं वाटप
नवी मुंबईतील सर्व प्रभागांमधील गरजूंना धान्य वाटलं जात आहे. परंतु हे धान्य वाटताना नागरिकांना एका ठिकाणी न बोलावता सोशल डिस्टन्ससिंगचे काटेकोरपणे पालन करून घरोघरी सेवा दिली जात आहे.
नवी मुंबई : कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा सर्वात जास्त फटका हातावर पोट असलेले मजूर , गरीब कष्टकरी आणि गरजूंना बसला आहे. रोजीरोटी बंद झाल्याने काम आणि कमाई नाही, त्यामुळे दोन वेळचं पोट कसं भरायचं, याची भ्रांत या समाजबांधवांसमोर आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या या कठीण काळात गरजू नागरिकांना आमदार गणेश नाईक यांनी मदतीचा हात दिला आहे. गणेश नाईकांनी गरजूंना धान्यरुपी मदतीचा हात देऊ केला आहे. एकूण 600 टन धान्य गरीब आणि गरजूंपर्यंत पोहोचवले आहे.
नवी मुंबईतील सर्व प्रभागांमधील गरजूंना धान्य वाटलं जात आहे. परंतु हे धान्य वाटताना नागरिकांना एका ठिकाणी न बोलावता सोशल डिस्टन्ससिंगचे काटेकोरपणे पालन करून घरोघरी सेवा दिली जात आहे. त्याच बरोबर 1 लाख 70 हजार मास्कचे वाटप भाजपतर्फे नवी मुंबईत केले जात आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर विना मास्क कुणीही बाहेर फिरताना दिसल्यास कारवाई होणार आहे. त्यामुळे नागरिकांना विनामुल्य दिल्या जात असलेल्या मास्कमुळे दिलासा मिळणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत 111 प्रभाग येत असून प्रत्येक प्रभागात गणेश नाईक यांनी सॅनिटाझर मशीन उपलब्ध करून दिल्याने या माध्यमातून सोसायट्यांमध्ये सॅनिटायझरींग केले जात आहे.
नवी मुंबईकरांसाठी सद्यस्थिती चिंताजनक असून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आज आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह नवी मुंबई परिसरात आढळले आहेत. कोपरखैरणे येथे हे रूग्ण आढळले असल्याने नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 30 च्या घरात गेली आहे. दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजच्या घटनेमुळे नवी मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिल्ली येथील निजामुद्दीनमधून फिलीपाईन्स नागरिक वाशीच्या मशिदीतमध्ये वास्तव्यास आला होता. त्याच्यामुळे हा संसर्ग नवी मुंबईतील वाशी , नेरूळ आणि कोपरखैरणे येथे पसरला आहे. दरम्यान सध्या शहरातील होम क्वॉरंटाईन केलेल्या लोकांची संख्या 1102 इतकी आहे. तर निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्यांची संख्या 125 आहे.