Corona Update | मुंबईतील जेजे पोलीस स्टेशनमधील 28 पोलिसांना कोरोनाची लागण
जेजे पोलीस स्टेशनच्या आणखी 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जेजे पोलीस स्टेशनमधील एकूण 28 कर्मचारी व अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज 16758 वर गेला आहे. पोलिसांनाही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. मुंबईतील जेजे पोलीस स्टेशन महाराष्ट्रमधील सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी असलेलं पोलीस स्टेशन बनलं आहे. जेजे पोलीस स्टेशनच्या आणखी 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जेजे पोलीस स्टेशनमधील एकूण 28 कर्मचारी व अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. मोजके कर्मचारी सोडून संपूर्ण पोलीस स्टेशन आता क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.
पुण्यात कोरोनामुळे पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; राज्यात आतापर्यंत चार जणांचा बळी
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर, राज्यात 456 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाबाधीत आहेत. फक्त मुंबईत 200 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 42 आधिकारी आणि 414 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत चार पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यातील तीन मुंबईतील आहेत.
पोलिसांना 50 लाखांचं कवच
कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पोलिसांसाठी विशेष योजना
कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसांना तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारच्या कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले होते.