(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रात परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिर्वाय; काल दिवसभरात 10 रेल्वे प्रवासी कोरोना बाधित
दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या मोठ्या प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव झालेल्या राज्यातून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची वैद्यकीय तपासणी सध्या करण्यात येत आहे. काल दिवसभरात या तपासणीत 10 प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत.
ठाणे : मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी कोरोनाचा जास्त प्रसार असलेल्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने काढले होते. त्याची अंमलबजावणी 25 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आली. त्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, बीएमसीने मुंबईतील महत्वाच्या स्थानकांवर वैद्यकीय कक्ष तयार केले आणि त्याद्वारे प्रवाशांची तपासणी सुरु केली. या तपासणीत 10 प्रवासी कोरोना बाधित देखील आढळले.
दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या मोठ्या प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव झालेल्या राज्यातून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची वैद्यकीय तपासणी सध्या करण्यात येत आहे. रेल्वे मार्गाने सर्वात जास्त प्रवासी येत असल्याने या राज्यातून येणाऱ्या एक्सप्रेस ज्या स्टेशनवर थांबतात. त्यावर वैद्यकीय कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे, एलटिटी, दादर, बोरिवली या स्थानकांवर हे वैद्यकीय कक्ष आहेत. आज सकाळ पासून दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा इथून आलेल्या एक्सप्रेस मधील प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली गेली. ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करून ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांच्या अँटीजन आणि आरटी-पीसीआर टेस्ट केल्या गेल्या. आज दिवसभरात 9779 प्रवाशांची तपासणी केली गेली. ज्यात 10 प्रवासी कोरोना बाधित आढळले. त्यांना लगेच जवळच्या कोरोना सेंटरवर पाठवण्यात आले.
काल दिवसभरात सीएसएमटी स्थानकात 1079, मुंबई सेंट्रल स्थानकात 3400, दादर स्थानकात 2000, लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात 315, वांद्रे टर्मिनस येथे 2047 तर बोरिवली स्थानकात 938 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सीएसएमटी आणि मुंबई सेंट्रल या स्थानकात एकही कोरोना बाधित प्रवासी आढळून आलेला नाही. सर्वाधिक पाच कोरोना बाधित वांद्रे स्थानकात, त्यानंतर 3 दादर स्थानकात, आणि प्रत्येकी 1 कोरोना बाधित बोरिवली आणि दादर स्थानकात आढळून आले आहेत. आजच्या या आकड्यावरून हेच लक्षात येतंय की, परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी अतिशय महत्त्वाची आहे.