केईएम रुग्णालयाच्या शीरपेचात मानाचा तुरा, 500 कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया पूर्ण
एका व्यक्तीला कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास 6 ते 15 लाखांपर्यंत खर्च येतो. पण, या शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयाने विविध संस्थांच्या मदतीने मोफत केल्या आहेत.
मुंबई : मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या शीरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जन्मत: कर्णबधीर असलेल्या मुलांसाठी अत्यंत खर्चीक आणि गुंतागुंतीची असणाऱ्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रीयेचं पाचवं शतक केईएम रुग्णालयानं नुकतंच पूर्ण केलंय. कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे आधुनिक उपकरणाच्या सहाय्यानं काहीही ऐकू न येणाऱ्या मुलांमध्येही श्रवण क्षमता तयार होते. पालिकेच्या केईएम रुग्णालयात 500 लहान मुलांना कॉक्लिअर इम्प्लांट बसवले आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येने अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे महापालिकेचे केईएम रुग्णालय हे मुंबईतील पहिले शासकीय रुग्णालय आहे, असा दावा रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. या शस्त्रक्रीयेद्वारे बसवलं जाणारं अत्याधुनिक यंत्र अत्यंत महागडं आहे. सुमारे 3 लाख ते 15 लाखांपर्यंत याची किंमत आहे. परदेशातूनच हे यंत्र आयात करावं लागत असल्यानं याची किंमत वाढते. त्यामुळे अनेक स्ववंसेवी संघटनांच्या आर्थिक सहाय्यानं केईएम रुग्णालयानं 500 शस्त्रक्रियांचा टप्पा ओलांडला आहे, असं ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. हेतल मार्फतिया यांनी सांगितले.
एका व्यक्तीला कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास 6 ते 15 लाखांपर्यंत खर्च येतो. पण, या शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयाने मोफत केल्या असून वेगवेगळ्या धर्मादाय संस्था आणि एनजीओच्या मदतीने शिवाय, क्राऊंड फंडिग करुन हे शक्य झाल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियांपैकी 10 टक्केच लोक प्रौढ आहेत. ज्यात 9 ते 82 वर्षापर्यंतच्या सर्व नागरिकांचा समावेश आहे. यात एका काळापर्यंत ऐकू येत होते, बोलता येत होते पण, काही काळानंतर अचानक ऐकू येणे बंद झाले अशा नागरिकांचा समावेश असतो. हेच प्रमाण परदेशात 78 टक्के आणि 22 टक्के पिडीयाट्रिकचे प्रमाण आहे. ज्या लोकांना ऐकू न आल्यामुळे बोलता येत नाही असे नागरिक किंवा लहान मुले डिप्रेशनमध्ये जातात. असे नागरिक दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यामुळे, अशा नागरकांनी उपचारांसाठी पुढाकार घ्यावा , असे केईएम रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मारफातिया यांनी सांगितले.
कॉक्लिअर इम्प्लांटच्या पाचशे शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केईएम रुग्णालयाने हा आनंद साजरा करत काही दिवसांपूर्वी केक सुद्धा कापला. या शस्त्रक्रियेसाठी केईएम रुग्णालयाला वेगवेगळ्या ठिकाणांहून निधी मिळतो. टाटा, सिद्धिविनायक, लालबाग अशा काही संस्थांकडून निधी पुरवला जातो. त्यानुसार, आतापर्यंत कोट्यावधींच्या शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयाकडून झालेल्या आहेत. मुंबईतील केईएम हे पहिले रुग्णालय ठरले आहे असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.
काय असते कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया ?
सामान्यपणे मातेच्या गर्भातच बाळाला ऐकू येते. पण, बाळाला जर दोन ते अडीच वर्षांपर्यंत ऐकू येत नसेल तर कानाच्या आत आणि बाहेर शस्त्रक्रिया करुन कॉक्लिअर इम्प्लांट बसवले जाते. तीन आठवड्यानंतर त्या मशीनचे स्विच ऑन केले जाते. त्यानंतर बाळाला ऐकून बोलण्याची थेरेपी घ्यावी लागते. या यशस्वी प्रक्रियेनंतर बाळ किंवा प्रौढ व्यक्ती बोलू आणि ऐकू शकते. त्यामुळे, जर बाळ बोलत नसेल, हाक मारला तर बघत नसेल तर आई-वडिलांनी बाळाची समस्या ओळखून तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे असे ही डॉ. हेतल मारफातिया यांनी सांगितले.
एवढ्या मोठ्या संख्येनं कॉक्लिअर इम्प्लांट सारख्या एवढ्या खर्चीक शस्त्रक्रीया मोफत करणारं केईएम रुग्णालय हे एकमेव ठरतंय. अर्थात याकरता सामुहिक आर्थिक मदतीची मोठी गरज आहे. लोकसहभागातून जर अशा खर्चीक शस्त्रर्कीया पार पडल्या तर हजारो कर्णबधिर बालकांना नवं आयुष्य देता येणं शक्य आहे.